कोल्हापूर – गोकुळ दुध संघातील अध्यक्ष पदावरून सुरु असलेल्या मोठ्या घडामोडीमुळे दुध उत्पाद्कांमधून संताप व्यक्त होत आहे. यावर माजी खासदार राजू शेट्टी यांनी संताप व्यक्त करत दुध उत्पादकांना विनंती केली आहे की, “त्या विरोधी 12 संचालकांना तुम्ही निवडून दिले आहात त्यांना जाब विचारा, तुम्हाला गैरहजर राहण्यासाठी संचालक केलं आहे का ?, तुम्हाला जमत नसेल तर राजीनामा द्या, घरात बसा, पण असली थेरं आम्ही खपवून घेणार नाही.
राजू शेट्टी यांनी म्हटले आहे कि, गोकुळ दूध संघाला दूध पुरवठा करणाऱ्या पाच लाख दूध उत्पादकांचा हा अपमान आहे अध्यक्ष पदासाठी कोरम पूर्ण होऊ नये यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने आजची अध्यक्षपदाची सभा तहकुब करण्यात आली आहे. देवेंद्रजी तुम्ही लोकशाही मानता की नाही, असा सवाल त्यांनी केला आहे.
तुम्ही महाराष्ट्रातील पक्ष फोडले, संघटना फोडल्या, एक नामवंत दूध संघ केवळ आपल्या पसंतीचा अध्यक्ष होत नाही म्हणून त्याच्या पाठीमागे अशा प्रकारच्या शुक्लकाष्ठ लावताय. एका बाजूला गुजरातच्या कंपनीला खुश करण्यासाठी तुम्ही जंगलं तोडत निघाला आहात तर दुसऱ्या बाजूला त्याच गुजरातमधील अमूलच्या दावणीला गोकुळ बांधण्यासाठी तुम्ही हे सर्व कारस्थान करताय हे काय आम्हाला कळत नाही काय ?, आमचा महाराष्ट्र कुठे घेऊन चाललाय… पाच लाख दूध उत्पादक तुम्हाला कधीच माफ करणार नाही.



