सहकार

गोकुळच्या चेअरमन निवडीला गणपूर्तीचा अडथळा ; पहिली सभा तहकूब…; २५ पैकी १३ संचालक उपस्थित

एस न्यूज प्रतिनिधी 1 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) चेअरमन निवडीसाठी नवनिर्वाचित संचालक मंडळाची पहिली सभा गुरुवारी सकाळी ११ वाजता गोकुळ शिरगाव येथील संस्थेच्या प्रधान कार्यालयात अध्यासी अधिकारी तथा करवीरच्या उपविभागीय अधिकारी मोसमी चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली. मात्र, २५ नवनिर्वाचित संचालकांपैकी केवळ १३ संचालक उपस्थित राहिल्याने आवश्यक गणपूर्ती होऊ शकली नाही. त्यामुळे सकाळी ११.१५ वाजता चेअरमन निवडीची सभा तहकूब करण्यात आली.

संस्थेच्या उपविधीतील नियम १४ (५अ) व (१२) मधील तरतुदींनुसार सभेचे कामकाज चालविण्यासाठी किमान १४ संचालकांची उपस्थिती आवश्यक आहे. मात्र, सभेला १३ संचालक उपस्थित होते, तर १२ संचालक अनुपस्थित राहिले. त्यामुळे गणपूर्तीअभावी चेअरमन निवडीची प्रक्रिया पुढे नेणे शक्य झाले नाही.

सभा तहकूब झाल्यानंतर उपस्थित १३ संचालकांनी आपले बहुमत असल्याचे सांगत चेअरमन निवडीची कार्यवाही सुरू करण्याची विनंती केली. यासंदर्भात त्यांनी अध्यासी अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनही सादर केले. मात्र, संबंधित निवेदन कारणांसह अमान्य करण्यात आल्याचे अध्यासी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

गणपूर्तीअभावी चेअरमन निवडीची प्रक्रिया पुढे जाऊ न शकल्याने गोकुळच्या नव्या नेतृत्वाची निवड तूर्तास रखडली आहे. त्यामुळे चेअरमन निवडीसाठी पुढील कार्यवाही कधी होणार, याकडे आता सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

संबंधित विषय

Scroll to Top