आ. विश्वजित कदम यांचे राज्य सरकारला आवाहन…
कोल्हापूर – गोकुळ दुध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेमध्ये महायुतीने अडथळा आणत अध्यक्ष पद निवडू दिलं नाही त्यामुळे मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. यावर आ. विश्वजित कदम यांनी, जनतेने बहुमत दिले असताना , सत्ता स्थापनेचा मार्ग अडवायचा, ही लोकशाहीची कोणती पध्दत?, असं पत्र लिहून संताप व्यक्त केला आहे.
आ. विश्वजित कदम यांनी म्हटले आहे कि, महाराष्ट्राच्या जडणघडणीत सहकार चळवळीचे योगदान अतिशय मोलाचे आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, स्वर्गीय यशवंतराव मोहिते, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील, डॉ. धनंजयराव गाडगीळ, वैकुंठभाई मेहता आणि देशभक्त पद्मश्री डॉ. रत्नाप्पाण्णा कुंभार अशा अनेक नेत्यांनी महाराष्ट्राची सहकार चळवळ समृध्द केली. शरद पवार यांनीही सहकार क्षेत्राच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले. या चळवळीने शेतकरी, कष्टकरी, दूध उत्पादक आणि सर्वसामान्य माणसाला आर्थिक बळ देऊन प्रगतीची संधी उपलब्ध करून दिली.
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत माझे बंधू आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने २५ पैकी १३ जागा जिंकून बहुमत मिळवले, कोल्हापूरच्या दूध उत्पादकांनी आणि मतदारांनी दिलेला हा कौल त्यांच्या विश्वासाचे प्रतीक आहे. या विश्वासाचा सन्मान करणे ही लोकशाहीची प्राथमिक जबाबदारी आहे.
मात्र, निवडणुकीत जनतेने दिलेला कौल स्वीकारण्याऐवजी अध्यक्षपदाच्या निवडीत कोरम पूर्ण होऊ न देणे, तांत्रिक अडचणी निर्माण करणे आणि सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेत अडथळे आणण्याचे प्रयत्न होत असतील, तर ही बाब अत्यंत गंभीर आहे. राजकीय मतभेद असू शकतात; परंतु त्यासाठी सहकार संस्थांच्या कामकाजाचा आणि दूध उत्पादकांच्या विश्वासाचा बळी देता कामा नये.
माझे राज्य सरकारला स्पष्ट आवाहन आहे की, राजकीय मतभेद बाजूला ठेवून मोठेपणा दाखवावा , कोल्हापूरच्या जनतेने दिलेला कौल मान्य करावा आणि गोकुळच्या अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया नियमानुसार, पारदर्शकपणे व कोणत्याही अनावश्यक अडथळ्यांशिवाय पार पडू द्यावी.



