कोल्हापूर – गोकुळ निवडणुकीत समविचारी आघाडीने १३ संख्याबळ मिळवून आपलं बहुमत सिद्ध केले आहे. परंतु अध्यक्ष निवडीसाठी १४ संचालकांचं कोरम पूर्ण होणे गरजेचे आहे. त्यासाठी आज गोकुळच्या नवनिर्वाचित संचालकांची बैठक बोलवण्यात आली आहे. परंतु आजच्या बैठकीला महायुतीचे संचालक दांडी मारणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
या बैठकीच्या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले या गोकुळ दूध संघात दाखल झाल्या आहेत. त्यानुसार गोकुळ शिरगाव येथील गोकुळ कार्यालयात समविचारी आघाडीचे संचालक येण्यास सुरुवात झाली आहे. या निवडीच्या पार्श्वभूमीवर समविचारी आघाडीकडून वकील बोलवण्यात आले असून कायदेशीर अभ्यास करण्यात येत आहे. यावेळी महायुतीचे संचालक अध्यक्ष निवड प्रक्रियेला गैरहजर राहण्यास कायदे अंतर्गत काय करता येईल याबाबत सल्ला घेतला जात आहे.
यावेळी गोकुळ दुध संघाच्या कार्यालयाबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.



