कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने २५ पैकी १३ संचालकांचे संख्याबळ मिळवत बहुमत सिद्ध केले असले, तरी अध्यक्ष निवडीसाठी आवश्यक असलेला १४ संचालकांचा कोरम पूर्ण होणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
आज सकाळी दहा वाजता निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले यांचे गोकुळ कार्यालयात आगमन झाले. त्यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित संचालकांच्या सभेला सुरुवात झाली. या सभेला समविचारी आघाडीचे सर्व १३ संचालक उपस्थित आहेत. मात्र, महायुतीचे संचालक अद्याप सभास्थळी दाखल झालेले नाहीत.
अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर समविचारी आघाडीकडून कायदेशीर प्रक्रियेची तयारी करण्यात आली आहे. त्यासाठी आघाडीच्या नेत्यांनी वकिलांनाही सोबत आणले आहे. दुसरीकडे, महायुतीचे संचालक अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला अनुपस्थित राहिल्यास त्यासंदर्भात कायदेशीर तरतुदी काय आहेत, याबाबतही सल्लामसलत सुरू असल्याची माहिती आहे.
दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी गोकुळ दूध संघाच्या कार्यालयाबाहेर मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. निवड प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर परिसरात तणावपूर्ण वातावरण असून, महायुतीचे संचालक सभेला उपस्थित राहणार का आणि अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पुढे कशी सरकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



