ब्रेकिंग न्यूज
इतर

महापालिकेकडून  रंकाळा रोडवरील वॉटर फ्रंट अपार्टमेंटमधील सात व्यावसायिक आस्थापने सील

एस न्यूज प्रतिनिधी 2 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर – महानगरपालिकेने  विनापरवाना व्यवसाय आणि घरफाळ्याच्या करआकारणीतील अनियमितते प्रकरणी मोठी कारवाई करत रंकाळा रोडवरील वॉटर फ्रंट अपार्टमेंटमधील सात व्यावसायिक आस्थापने सील केली आहेत. या कारवाईदरम्यान बी. एम. एक्स. कापड शोरूममधल्या  कर्मचाऱ्यांना आत डांबून बाहेरून कुलूप लावण्याचा प्रयत्न झाल्याचे  समोर आले आहे. महापालिकेच्या पथकाने तत्काळ हस्तक्षेप करून कर्मचाऱ्यांची सुटका करत संबंधित दुकान सील केले आहे.

या कारवाईदरम्यान पीटर इंग्लंड कपडे शोरूम, दीपक साडी सेंटर, टेबल ड्रायल लाँड्री, बी. एम. एक्स. कापड दुकान, महालक्ष्मी एक्सक्लुझिव्ह, वेस्टर युनिक आणि लॉरीआय लाँड्री प्रोफेशनल या सात आस्थापनांकडे  आवश्यक व्यवसाय परवाना नसल्याचे, तसेच भाडेकरारानुसार घरफाळ्याची करआकारणी करण्यात आली नसल्याचे निदर्शनास आले आहे.

दरम्यान, बी. एम. एक्स. कापड शोरूमच्या परवान्याची तपासणी सुरू असताना दुकान मालकाने दुकान सील होऊ नये या भीतीपोटी कर्मचाऱ्यांना दुकानाच्या आत डांबून बाहेरून कुलूप लावून निघून जाण्याचा प्रयत्न केल्याचे महापालिकेच्या पथकाच्या निदर्शनास आले. यावेळी पथकाने तत्काळ हस्तक्षेप करत दुकानातील कर्मचाऱ्यांना बाहेर काढले. त्यानंतर संबंधित दुकान सील करण्यात आले.

महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या आदेशानुसार, उपआयुक्त किरणकुमार धनवाडे आणि सहायक आयुक्त स्वाती दुधाणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यापूर्वी संबंधित व्यावसायिकांना नवीन व्यवसाय परवाना घेण्यासाठी तसेच  आवश्यक भाडेकरार सादर करण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र, नोटिसांनंतरही आवश्यक कार्यवाही न झाल्याने महापालिकेने  ही कारवाई केली.

या कारवाईत परवाना अधीक्षक अशोक यादव, परवाना निरीक्षक उदय भोसले, वरिष्ठ कर सहायक सोहेल शेख, सचिन इंगवले, उपद्रव शोध पथकाचे अशोक साठे, विनोद रुईकर, युवराज पोवार, भोलानाथ पाटणकर यांच्यासह घरफाळा विभाग आणि विभागीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

संबंधित विषय

Scroll to Top