कोल्हापूर – हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथे अल्पवयीन मुलीची निर्घुण हत्या करण्यात आली आहे. या झालेल्या हत्येमुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत मयतावर अंतिम संस्कार करणार नसल्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.
शनिवारी रात्री नऊ च्या दरम्यान 37 वर्षीय संशयित आरोपी अरुण लगमावर याने मुलीवर धारदार शस्त्राने वार केला आहे. एकतर्फी प्रेमातून ही हत्या झाल्याची माहिती समोर येत आहे.
नवरात्र उत्सवानिमित्त अल्पवयीन मुलगी जैन मंदिरामध्ये आरतीच्या कार्यक्रमासाठी गेली होती. आरती झाल्यानंतर ती घरी येत असताना रस्त्यावर कोणी नसल्याचा फायदा घेत अंधारामध्ये दबा धरून बसलेल्या नराधमाने तिचा एडक्याने गळा कापून हात आणि पायावर गंभीर वार केलेत आणि ती मृत पावल्याची खात्री झाल्यानंतर तो पसार झाला.
या झालेल्या गंभीर घटनेमुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा लवकरात लवकर निकाल लागावा यासाठी हे प्रकरण जलद न्यायालयात चालवून, आरोपीला गावाच्या चौकात फाशी द्या, अशी मागणी करत ग्रामस्थ आक्रोश व्यक्त करत आहेत. त्यामुळे गावामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.



