गाव तिथं शाळा, वर्ग तिथं शिक्षक’ तत्त्वाची प्रभावी अंमलबजावणी करा !
कोल्हापूर – शाळा बंद करण्याच्या धोरणाला विरोध आणि शिक्षकांवरील वाढत्या प्रशासकीय कामांचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने राधानगरी येथील शिक्षण विभागाच्या कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात सहभागी शिक्षकांनी ‘शाळा वाचवा, शिक्षण वाचवा’, ‘गाव तिथं शाळा, वर्ग तिथं शिक्षक’, ‘मुलांना शिकू द्या, शिक्षकांना शिकवू द्या’ आणि ‘शिक्षकांवरील ऑनलाईन कामांचा भडीमार बंद करा’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रमोद तोंदकर यांनी विद्यार्थीसंख्या कमी असल्याच्या कारणावरून शाळा बंद करणे हा ग्रामीण, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कांवर परिणाम करणारा निर्णय ठरू शकतो असे सांगत शाळा बंद करु नयेत, शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नयेत अशा मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे सांगितले.
कोल्हापूर – शाळा बंद करण्याऐवजी रिक्त शिक्षकपदे भरावीत, आवश्यक शैक्षणिक सुविधा आणि साहित्य उपलब्ध करून द्यावे, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पोषक वातावरण निर्माण करावे, अशा मागण्यांचे निवेदन गटशिक्षणाधिकारी धनंजय मेंगाने यांना देण्यात आले.
शिक्षक संघ, केंद्रप्रमुख संघटना, पेन्शन हक्क संघटना, वस्तीशाळा शिक्षक संघटना आणि जुनी पेन्शन संघटना यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला.
यावेळी पंचायत समिती सदस्य बबन जाधव, संग्रामसिंह कलीकते, बाळासाहेब पोवार, राजेंद्र पाटील, तालुकाध्यक्ष विक्रम वागरे, विकास पाटील, मधुकर मुसळे, उत्तम फराकटे, अशोक साबळे, अशोक वाघरे, शिवाजी झाटे यांच्यासह शिक्षक, शाळा व्यवस्थापन समित्यांचे अध्यक्ष, सदस्य उपस्थित होते.




