कोल्हापूर – करवीर तालुका प्राथमिक शिक्षण समितीच्यावतीने करवीर पंचायत समिती कार्यालयासमोर ‘शाळा वाचवा, शिक्षण वाचवा धरणे आंदोलन’ करण्यात आले.
शासनाकडून शिक्षकांवर विविध अशैक्षणिक कामांचा बोजा टाकला जात असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्याचा परिणाम होतोय. शिक्षकांना अध्यापनासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षकांना अध्यापनासाठी अधिक वेळ उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली.
पटसंख्येअभावी कोणतीही शाळा बंद करू नये, ‘गाव तिथं शाळा आणि शाळा तिथं शिक्षक’ हे तत्त्व अंमलात आणून प्रत्येक गावातली शाळा सक्षम ठेवावी, विद्यार्थ्यांच्या पटसंख्येचा विचार करताना केवळ संख्यात्मक निकष न लावता शाळेपासूनचे भौगोलिक अंतर आणि वाहतुकीच्या सुविधांचाही विचार करावा. तसेच शिक्षकांवरील ऑनलाईन कामांचा अतिरिक्त ताण कमी करून त्यांना अध्यापनासाठी पुरेसा वेळ द्यावा, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
या आंदोलनादरम्यान शिक्षकांनी ‘शाळा वाचवा, शिक्षण वाचवा’ अशा घोषणा देत जिल्हा परिषद शाळांच्या संरक्षणासाठी एकजुटीने लढा देण्याचा निर्धार करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र सूर्यवंशी, विश्वनाथ पाटील, करवीर पंचायत समितीचे सभापती साताप्पा पाटील, उपसभापती दीपाली पाटील, कृष्णात कारंडे, सुरेश कोळी आणि वर्षा केनवडे यांनी मनोगतं व्यक्त केली. या आंदोलनात शिक्षक समितीचे कार्याध्यक्ष निवास पाटील, सरचिटणीस बाबासो धुमाळ, तालुकाध्यक्ष गजानन मोरे, प्रभाकर कमळकर, चंद्रकांत पाटील, हरिदास वर्णे, सुकुमार मानकर, धनाजी पाटील आणि प्रताप पाटील यांच्यासह शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.




