पुणे – गेल्या १२ दिवसांपासून पुण्यात आ. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. काल सायंकाळी उशिरा मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विद्यार्थ्यांची भेट घेवून सरकारची भूमिका स्पष्ट केली.
मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले कि, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमधील पेपरफुटी प्रकरणांचा तपास करण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी आयोगाची स्थापना करण्यात येणार आहे. आयोगाच्या अध्यक्षपदी मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती दिलीप भोसले आणि सचिवपदी ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चौकशी दोन महिन्यांत पूर्ण करण्याचा प्रस्ताव असून, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे आणि २०२७ मधील गट-क परीक्षेतील पदसंख्या दुप्पट करण्याच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. समितीची चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष विवेक भीमनवारांनी स्वतःहून रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
सचिवपदी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासह माजी न्यायाधीश पी. डी. नाईक, पोलीस महानिरीक्षक लखमी गौतम, सेवानिवृत्त अधिकारी गणेश पाटील यांचा या समितीत समावेश करण्यात आला आहे.




