पुणे – महाज्योती शिष्यवृत्ती परीक्षेत मोठा गोंधळ झाल्याने ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. परीक्षा देण्यासाठी सकाळी विद्यार्थीनी केंद्रावर पोहोचल्या होत्या. मात्र, परीक्षा केंद्रावर संगणकाची व्यवस्था करण्यात आलेली नसल्यामुळे विद्यार्थिनींना केंद्रा बाहेरच खूप काळ थांबवण्यात आले. तसेच नियोजित वेळ उलटून गेल्यानंतरही परीक्षा सुरू झाली नाही. अखेर संबंधित केंद्रावरील परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आल्याने विद्यार्थिनींमधून संताप व्यक्त होत आहे.
याबाबतचा व्हिडीओ आ. रोहित पवार यांनीही शेअर केला आहे. आ. रोहित पवार यांनी म्हटले आहे कि, परीक्षेतील गोंधळ, पेपरफुटी ही जणूकाही विद्यार्थ्यांच्या पाचवीलाच पूजलेली आहे, असाच प्रकार सध्या सुरू आहे. महाज्योतीसारख्या अत्यंत महत्त्वाच्या संस्थेच्या परीक्षेतदेखील आज मोठा गोंधळ झाल्याचे समोर आले आहे.
त्यासाठीच आम्ही म्हणतो, परीक्षा ऑनलाइन नको, तर ऑफलाइनच हव्यात. हे सर्व घोळ रोखण्यासाठी संपूर्ण सिस्टीमचे क्लीनअप गरजेचे आहे आणि त्याची सुरुवात भ्रष्ट अध्यक्ष भीमनवार यांच्या राजीनाम्यापासून करावी. नागपुरातील महाज्योतीच्या विद्यार्थ्यांनी आज महाज्योती कार्यालयावर जाऊन या भ्रष्ट प्रशासनाला जाब विचारावा! पुण्यातील सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सत्याग्रहस्थळी उपस्थित राहून आपल्या व्यथा मांडाव्यात. चला, लढूया आणि जिंकूया!, असे म्हटले आहे.




