राहुल भैय्या तुम्ही राष्ट्रवादी प्रवेशानं काय साध्य केलं? आणि बंटी पाटलांनी तुमचं वाईट काय केलं? दिवंगत आ.पी.एन.पाटील यांच्या निष्ठावंतांचा सवाल

कोल्हापूरच्या सार्वत्रिक राजकारणासह गोकुळ दूध संघ,जिल्हा बँक यासह सहकारी संस्थां मध्ये दिवंगत आमदार पी.एन.पाटील यांचा गेली अनेक वर्षे दबदबा राहिला आहे.या पार्श्वभूमीवर सध्या सुरु असलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणूकीत निष्ठावंत कार्यकर्त्यांना पी.एन.पाटील यांची उणीव जाणवू लागलीय. पी.एन.पाटील यांच्या अकाली जाण्यानंतर त्यांच्या गटाचे जिल्ह्यातील राजकारणातील कमी होत चाललेल्या महत्त्वामुळे आणि गोकुळ दूध संघाच्या निवडणूक प्रक्रियेत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांचा फारसा सहभाग नसणे कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागले आहे. अस्वस्थ झालेले कार्यकर्ते आता थेट समाज माध्यमां मधून आपली खदखद मांडू लागले आहेत.स्वर्गीय पी.एन.पाटील यांचा एक निष्ठावंत कार्यकर्ता असा उल्लेख असलेला एक लेख सध्या समाज माध्यमातून व्हायरल होत आहे. या लेखातून जिल्हा परिषद निवडणूकीत उमेदवारी निश्चित करताना पी.एन.पाटील गटावर झालेला अन्याय, गोकुळच्या निवडणूकीत मिळत नसलेला सन्मान यासह विविध मुद्यांवर भाष्य करत ना. हसन मुश्रीफ, भोगावती कारखान्याचे चेअरमन शिवाजी पाटील, गोकुळचे माजी संचालक बाळासाहेब खाडे, गोकुळचे माजी चेअरमन अरुण डोंगळे, विश्वास पाटील यांना लक्ष्य करतानाच आमदार चंद्रदीप नरके आणि गोकुळचे माजी संचालक अजित नरके यांच्या वाढत्या ताकदीकडे लक्ष वेधण्यात आले आहे. या लेखातून आमदार सतेज पाटील जिल्ह्याच्या राजकारणात दाखवलेला लढवय्येपणाचा उल्लेख करताना राहुल भैय्या तुम्ही राष्ट्रवादी प्रवेशानं नेमकं काय साध्य केलं? आणि बंटी पाटलांनी तुमचं वाईट काय केलं? असे सवाल उपस्थित करण्यात आले आहेत.येणार्‍या काळात कार्यकर्ते कंदील घेऊन शोधावे लागतील अशी भीती व्यक्त करतानाच आजही वेळ गेलेली नाही. आपण सर्वांनी थांबून, मागे वळून पाहून आणि पुढचा राजकीय मार्ग कोणता असावा, याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे अशी साद या कार्यकर्त्याने जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांना घातली आहे. सध्या समाज माध्यमातून व्हायरल होत असलेला दिवगंत पी.एन.पाटील यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्याचा हा लेख जसाच्या तसा..

राहुल भैय्या तुम्ही राष्ट्रवादी प्रवेशानं काय साध्य केलं?

स्वर्गीय पी एन पाटील साहेब जाण्याने गटाचे फार मोठे नुकसान झाले. शिवाजी पाटील साहेब आणि बाळासाहेब खाडे तुम्ही खरंतर मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहायला हवे होते गटाला सावरायला हवे होते. राहुल भैया आणि राजेश दादा हे दोघे राजकारणातील अजून कसलेले नेतृत्व नव्हते. स्वर्गीय पी एन साहेबांच्या जाण्याने अचानक नेतृत्वाची जबाबदारी त्यांच्यावरती आली शिवाजी पाटील तुमाला कारखान्यातून मिळकत व्हावी आणि बाळासाहेब खाडेना गोकुळ मध्ये स्थान मजबूत राहावे याकरिता तुम्ही आपला पूर्ण गट हसन मुश्रीफ यांच्या दावणीला बांधला … यातून शिवाजी पाटील आणि बाळासाहेब खाडे तुम्हाला नेमकं काय साध्य करायचे आहे ? दुसरीकडे हसन मुश्रीफ अजित नरके यांना जिल्हा बँकेत वाट सुखकर करून देत आहेत. आबाजींना गोकुळ मध्ये परत नव्याने मजबूत करत आहेत. भविष्यात विधानसभेची लढाई ही नरके यांचे विरोधात असणार आहे इथे आपल्याला काँग्रेसच पाठीशी राहणार आहे मग काँग्रेस संपवून आपण भविष्यात काय मिळवणार आहोत ?

मुश्रीफ साहेब, जवळपास ३०-४० वर्षांची निष्ठा आम्ही तुमच्या चरणी अर्पण केली. स्वर्गीय पी. एन. पाटील यांच्या निधनानंतर राहुल भैय्या आणि राजेश दादांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. खरं तर हा निर्णय आम्हा सर्व कार्यकर्त्यांसाठी खूप कठीण होता. अनेक वर्षांचा संघर्ष आणि काँग्रेससोबत जोडलेल्या असंख्य आठवणी आम्हाला अस्वस्थ करत होत्या. मात्र, नेतृत्वाने घेतलेल्या निर्णयाशी ठाम राहण्याची भूमिका आम्ही सर्वांनी घेतली.

प्रवेशापूर्वी काही गोष्टींवर चर्चा झाली होती. करवीर, भोगावती काठ आणि राधानगरी मतदारसंघात स्वर्गीय पी. एन. पाटील यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांच्या बळावर आम्ही आजपर्यंत जिल्ह्याच्या राजकारणावर वर्चस्व ठेवत आलो. मग ती जिल्हा बँक असो, जिल्हा परिषद असो, विधानसभा असो किंवा लोकसभा निवडणूक स्वर्गीय पी. एन. पाटील यांच्या शब्दाला या जिल्ह्यात मोठे वजन होते.

मात्र, राहुल पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर अनेक राजकीय निर्णयांमुळे स्वर्गीय पी. एन. पाटील गटाचे अस्तित्व कमकुवत होताना दिसत आहे.

विशेषतः राधानगरी तालुक्यातील राशिवडे आणि कसबा तारळे जिल्हा परिषद मतदारसंघात स्वर्गीय पी. एन. पाटील यांची मोठी ताकद होती. राहुल पाटील यांच्या प्रवेशानंतर त्या जागांवर त्यांचा नैसर्गिक हक्क असताना, त्यांना डावलून अरुण डोंगळे यांच्या आग्रहापोटी ती जागा त्यांच्या मुलीला सोडली गेली.

तसेच, राशिवडे जिल्हा परिषद मतदारसंघात के. पी. पाटील आग्रही असल्याने त्यांच्यासाठीही एक जागा सोडण्यात आली. मग आम्ही तुमच्यासोबत येऊन नेमके काय मिळवले, हा प्रश्न आज संपूर्ण पी. एन. पाटील गटाला अस्वस्थ करत आहे.

खरं तर, भोगावती पट्ट्यात हसन मुश्रीफ यांनी राजकीय निर्णय घेताना राहुल पाटील यांना डावलणे हेच मुळात चुकीचे आहे.स्वर्गीय पी. एन. पाटील साहेब असताना भोगावती व करवीर परिसरात बंटी पाटील साहेबांनी कधीही हस्तक्षेप केला नाही. पी. एन. साहेब जो निर्णय घेतील, त्याला त्यांनी नेहमी सहमती दर्शवली.

यापूर्वी स्वर्गीय पी. एन. पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुंगावसारख्या छोट्या गावातील, साधा जीप वडाप व्यवसाय करणारे पांडुरंग भांदिगरे यांच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला निवडणुकीची संधी देऊन त्यांना निवडून आणले होते. इतके मोठे सामर्थ्य असताना, आज जर आम्हाला अरुण डोंगळे यांच्या दावणीला बांधले जात असेल, तर येणार्‍या काळात आम्हालाही वेगळा पर्याय शोधावा लागेल.

आदरणीय राहुल भैय्यांना देखील आमची कळकळीची विनंती आहे. स्वर्गीय पी. एन. पाटील साहेब विधानसभेला चार वेळा पराभूत झाले, पण ते कधी डगमगले नाहीत. करवीर, राधानगरी आणि भोगावती खोर्‍यातील जिगरबाज कार्यकर्ते मोठ्या ताकदीने त्यांच्या मागे उभे राहिले होते.

पण एका पराभवानंतर काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय आजही आमच्या मनाला पटलेला नाही.भोगावती कारखान्याचे चेअरमन शिवाजी पाटील आणि गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांनी स्वतःची वाट सुखकर करण्यासाठी घ्यायला लावलेला निर्णय आज कार्यकर्त्यांच्या मुळावर उठताना दिसत आहे.

राहुल भैय्या, तुम्ही महायुतीत गेल्यानंतर भोगावती काठावर आपल्या गटाची पडझड झाली आणि आता युतीधर्म म्हणून ज्यांच्या विरोधात आम्ही लढलो, त्या चंद्रदीप नरके यांच्यासोबत जाऊन नेमकं काय साध्य करायचे आहे?

भैय्या, येणार्‍या काळात कंदील घेऊन कार्यकर्ते शोधण्याची वेळ येईल, अशी भीती आम्हाला वाटते.भोगावती काठावर अरुण डोंगळे गोकुळचे संचालक झाले, त्यांनी चेअरमनपद भोगले, त्यांची मुलगी जिल्हा परिषद सदस्य झाली. दुसरीकडे, हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नविद मुश्रीफ गोकुळचे चेअरमन झाले. अलीकडे जिल्हा परिषदेत त्यांच्या कार्यकर्त्यांच्या पत्नीला अध्यक्षपद मिळाले.

या सर्व राजकारणाच्या सारीपाटावर राहुल भैय्या, आपण आणि आपला कार्यकर्ता नेमका कुठे आहे?पूर्वी स्वर्गीय पी. एन. पाटील साहेब गोकुळचे उमेदवार ठरवत होते. त्यांनी अनेक सामान्य, फाटक्या माणसांना गोकुळचे संचालक केले. पण आज गोकुळ निवडणुकीत महायुतीचे नेते म्हणून आपल्याला किती वेळा मुख्य स्थानी बोलावले जाते आणि किती मानाचे स्थान दिले जाते, हा देखील चिंतनाचा विषय आहे. आत्ता होत असलेल्या गोकुळ निवडणुकीमध्ये एक जनरल आणि एखाद्या राखीव जागेवर आपली बोळवण होते की काय असे चित्र दिसत आहे.

राहुल भैय्या, आज आपण काँग्रेसमध्ये असता, तर गोकुळमध्ये उमेदवार कोण द्यायचे हे तुम्ही ठरवले असते. राधानगरी तालुक्यात गोकुळची एक जागा आणि करवीर तालुक्यात तीन अशा चार जागांवर आपल्या गटाला संधी मिळवून आपण आपला गट मजबूत करू शकलो असतो.जिल्हा परिषदेच्या जवळपास सात-आठ जागांवर आपल्या माणसांना उमेदवारी देऊन उमेदवार ठरवण्याची ताकद आपल्या हातात असती. जवळपास तीन-चार तालुक्यांमध्ये आपल्या कार्यकर्त्यांना संधी देऊन जिल्ह्याचे नेतृत्व आपल्या हातात घेता आले असते.पण काँग्रेसची वाट सोडून आपण नको त्या वाटेला गेल्याने आज डोंगळे आणि आबाजी यांसारख्या तळ नसलेल्या माणसांच्या पंक्तीत बसण्याची वेळ आली आहे, ही मोठी शोकांतिका आहे.स्वर्गीय पी. एन. पाटील साहेब असताना डोंगळे आणि आबाजी यांना लुडबुड करण्याचे धाडस होत नव्हते. पण राष्ट्रवादी प्रवेशानंतर धामणंसुद्धा फणा काढू लागली आहेत.काल राशिवडे आणि कसबा तारळे या दोन जिल्हा परिषद जागा आपण गमावल्या. परिते जिल्हा परिषद मतदारसंघही आपल्या हातातून निसटला. भविष्यात भोगावती कारखानाही गमवावा लागू शकतो.स्वर्गीय पी. एन. पाटील साहेबांनी उभा केलेल्या किल्ल्याचा एक-एक चिरा आता ढासळू लागला आहे.

राहुल भैय्या, अजूनही वेळ गेलेली नाही.एका बाजूला चंद्रदीप नरके आपल्याला संपवत आहेत. जिल्हा बँकेच्या जागेबाबत आपण मुश्रीफांकडून शब्द घेतला आहे. मात्र, दुसर्‍या बाजूला अजित नरके दूध संस्था गटातून ठराव गोळा करत आहेत.

भविष्यात जिल्हा बँकेची वाट सुखकर करण्यासाठी त्यांनाही दुसरीकडे मुश्रीफांकडून प्रयत्न होत आहेत. ज्या चंद्रदीप आणि अजित नरके या बंधूंनी अरुण नरके यांच्या वारसाला, अर्थात चेतन नरके यांनाही न जुमानता पन्हाळा तालुक्यात दूध संघाची पाळेमुळे घट्ट रुजवत आपले बस्तान बसवले आहे, तिथे राहुल भैय्या, भविष्यात तुमची अवस्था काय होईल, याचा विचार करा.मग प्रश्न असा आहे मुश्रीफांसोबत जाऊन तुम्ही नेमकं साध्य काय केलं? आणि बंटी पाटलांनी तुमचं वाईट काय केलं?एका बाजूला चंद्रदीप आणि अजित नरके यांचे राजकारण, दुसर्‍या बाजूला आबाजी आणि डोंगळे यांसारखी राजकीय गिधाडे आपली लचके तोडत आहेत, तर तिसर्‍या बाजूला पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर हे कंत्राटदारीच्या आमिषातून आपला एक-एक कार्यकर्ता आपल्या गटात सामील करून घेत आहेत.आज तुमची अवस्था चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यूसारखी झाली आहे.दुसरीकडे, बंटी पाटील यांच्यासारखा एकटा लढवय्या संपूर्ण जिल्ह्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्षाला पुरून उरतो आहे. जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये या एकट्या माणसाने सर्वांना घाम फोडला आहे.

राहुल भैय्या, एकदा मागे वळून पाहा. स्वर्गीय पी. एन. पाटील साहेबांनी उभा केलेला कार्यकर्ता, त्यांनी निर्माण केलेली राजकीय ताकद आणि त्यांनी सामान्य माणसाला दिलेले बळ हे सर्व आज कुठे आहे, याचा विचार करा.अनेक वर्षाचा संघर्ष करून आपल्या सोबत आलेल्या शेतकरी कामगार पक्षाची देखील आपल्यामुळे फरपट झाली. राजकारण संपले तरी चालेल पण शेतकरी कामगार पक्ष सोडायचा नाही ही विचारधारा घेऊन आयुष्य व्यथीत केलेल्या संपत बापूंच्या मुलाला देखील राष्ट्रवादीच्या तिकिटावरती उभारायची वेळ आली. आपली आणि आपल्या सोबत येणार्‍यांच्या राजकारणाची देखील माती व्हायची वेळ आली.अजूनही वेळ गेलेली नाही… देशात आणि राज्यात भाजप विरोधी प्रवाह मोठ्या प्रमाणात तयार होत आहे भविष्यात निश्चित आपल्या काँग्रेसला चांगले दिवस येतील. आणि येणार्‍या विधानसभेला नरके यांच्या विरोधात लढायला गावगाड्यातील काँग्रेसचा आपला कार्यकर्ताच मजबूतीने उभा राहील.

भैय्या, माफ करा. लहान तोंडी मोठा घास घेतोय. पण जे काही बोलतोय, ते तळमळीने बोलतोय. कोणावर व्यक्तिगत टीका करण्याचा हा हेतू नाही; मात्र वर्षानुवर्षे तुमच्यासोबत उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांच्या मनातील अस्वस्थता व्यक्त करणे गरजेचे वाटते.आजही वेळ गेलेली नाही. आपण सर्वांनी थांबून, मागे वळून पाहून आणि पुढचा राजकीय मार्ग कोणता असावा, याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.

– स्वर्गीय पी. एन. पाटील यांचा एक निष्ठावंत कार्यकर्ता

यांचा एक निष्ठावंत कार्यकर्तादिवंगत आमदार पी.एन.पाटील यांच्या गटाची होत असलेली पिछेहाट त्यातून कार्यकर्त्यांचे होत असलेले खच्चीकरण याचे वास्तव मांडणार्‍या या लेखाला पी.एन.पाटील गटाच्या अनेक कार्यकर्त्यां कडून आमच्या सुध्दा मनात हीच भावना आहे असा प्रतिसाद दिला जात आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांची घुसमट मांडणार्‍या या लेखावर राहुल आणि राजेश पाटील हे बंधू तसेच पी.एन.पाटील गटाचे प्रमुख शिलेदार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट कसा प्रतिसाद देणार हे पहावे लागेल.

Scroll to Top