कोल्हापूर – काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी आज कोल्हापूरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारकडून अपेक्षित उपाययोजना राबवल्या जात नसल्याबद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
मुख्यमंत्र्यांनी दुष्काळी भागाचे दौरे करण्याअगोदर शेतकऱ्यांना मदत जाहीर करायला हवी होती असे सांगत हे दौरे दुष्काळी मदतीचे क्रेडीट घेण्यासाठी आहे का ? असा सवाल उपस्थित केला आहे. एल निनोचा परिणाम होणार हे माहिती असून सुध्दा शासन झोपलेले असून त्याला जागे करावे लागणारंय असे सांगत आमदार सतेज पाटील यांनी सरकारने पंचनाम्यांचे फार्स न करता शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी केली आहे. सरकारने शेतकऱ्यांना उध्दवस्त करणारा शक्तीपीठ महामार्गाचा जमीन अधिग्रहण निधी दुष्काळासाठी वापरुन उध्दवस्त होण्यापासून शेतकऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला तर सरकारला पुण्य मिळेल, असा टोलाही त्यांनी सरकारला लगावला.
शेतकऱ्यांना मदत देतानाच सरकारला नियम आठवतात असे सांगत आमदार सतेज पाटील यांनी सध्या कुठल्या निवडणूका नसल्यामुळे सरकार शेतकऱ्यांना दुष्काळी मदत करेल, असे वाटत नाही पण काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी लढत राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली. उपसाबंदीमुळे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीबद्दल बोलताना आमदार सतेज पाटील सरकारचे नियोजन चुकत असल्याचा आरोप करत सुपर एल निनोचा परिणाम होणार हे मुख्यमंत्र्यांना आज समजले का? असा सवालही आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला आहे.
विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणूक महाविकास आघाडी लढणारय असे सांगत आमदार सतेज पाटील यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शिक्षक आणि पदवीधर महाविकास आघाडीसोबत राहील, असा विश्वास व्यक्त केला. या पत्रकार बैठकीत आमदार सतेज पाटील यांनी निधी मिळत नसल्याने कोल्हापूर जिल्हा परिषद सदस्यांमधील अस्वस्थता आणि कोल्हापूर महानगरपालिकेतील नगरसेवकांमधील वादावर मिश्किल टिप्पणी केली. साखर कारखाने पंधरा ऑक्टोबरला सुरु केले तर शेतकऱ्यांचेच नुकसान होईल असे सांगतानाच गोकुळसाठी आपल्याकडे बिनविरोध निवडणूकीचा कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे स्पष्ट केले आहे.
या पत्रकार बैठकीला आमदार जयंत आसगांवकर, जिल्हा परिषद सदस्य सागर धुंदरे, अमरसिंह पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.




