S Newsच्या बातमीची दखल; NCMC कार्डच्या सक्तीला एसटी महामंडळाची तात्पुरती शिथिलता

१५ सप्टेंबरपर्यंत जुन्या पद्धतीने सवलत; १६ ते ३० सप्टेंबरदरम्यान कार्डची पावती ग्राह्य — १ ऑक्टोबरपासून NCMC कार्ड अनिवार्य

कोल्हापूर : एसटी महामंडळाच्या प्रवासातील विविध सवलतींसाठी NCMC कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयामुळे सर्वसामान्य प्रवाशांना निर्माण झालेल्या अडचणी आणि प्रवासी-वाहकांमधील वाढते वाद याबाबत ‘एस न्यूज’ ने आवाज उठवला होता. या बातमीमध्ये प्रवाशांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करत, तांत्रिक अडचणींमुळे सवलतीचा लाभ घेताना येणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधले होते. या बातमीची दखल घेत राज्य परिवहन महामंडळाने NCMC कार्डच्या अंमलबजावणीत तात्पुरती शिथिलता देण्याचा निर्णय घेतला आहे.

NCMC कार्डच्या सक्तीमुळे सवलतीच्या प्रवाशांना बसप्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. कार्ड काढलेले असतानाही ते बसमध्ये दाखवताना येणाऱ्या अडचणी, कार्डची नोंदणी किंवा सक्रियता न होणे, मशीनमध्ये कार्ड वाचले न जाणे, तांत्रिक बिघाड तसेच इतर प्रक्रियात्मक अडचणींमुळे प्रवासी आणि वाहक यांच्यात वादाचे प्रसंग निर्माण होत होते.

विशेषतः ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, दिव्यांग प्रवासी तसेच विविध सवलतींचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना या प्रक्रियेमुळे मोठा त्रास सहन करावा लागत होता. आवश्यक कागदपत्रे आणि पात्रता असूनही केवळ NCMC कार्डशी संबंधित तांत्रिक अडचणींमुळे सवलतीचा लाभ मिळण्यात अडथळे येत होते.

या समस्यांमुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. ‘एस न्यूज’ ने याच मुद्द्यावर बातमी करत सर्वसामान्य प्रवाशांच्या भावना प्रशासनासमोर मांडल्या होत्या. प्रवाशांना होत असलेल्या त्रासाची दखल घेऊन एसटी महामंडळाने आता संक्रमण कालावधी निश्चित केला आहे.

१५ सप्टेंबरपर्यंत जुन्या पद्धतीने सवलत…….
नवीन निर्णयानुसार, १५ सप्टेंबरपर्यंत प्रवाशांना पूर्वीप्रमाणे सवलतीचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे या कालावधीत NCMC कार्ड नसल्यामुळे प्रवाशांना सवलतीपासून वंचित ठेवले जाणार नाही.

त्यानंतर १६ सप्टेंबर ते ३० सप्टेंबरदरम्यान NCMC कार्ड काढल्याची पावती दाखविल्यास प्रवाशांना सवलत देण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या प्रवाशांनी अद्याप NCMC कार्डची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांना या कालावधीत कार्ड काढण्यासाठी मुदत मिळणार आहे.

१ ऑक्टोबरपासून मात्र कार्ड अनिवार्य….
दरम्यान, ही शिथिलता केवळ तात्पुरती असून ३० सप्टेंबरनंतर सवलतीचा लाभ घेण्यासाठी NCMC कार्ड अनिवार्य राहणार आहे. म्हणजेच १ ऑक्टोबरपासून NCMC कार्डशिवाय सवलत मिळणार नाही. त्यामुळे सवलतीच्या प्रवाशांनी ३० सप्टेंबरपूर्वी NCMC कार्डची नोंदणी, सक्रियता आणि इतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून घेणे गरजेचे आहे.

एसटी महामंडळाच्या या निर्णयामुळे सध्या तरी प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून, NCMC कार्डच्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी आणि प्रवाशांना सुलभ पद्धतीने कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी महामंडळाने आवश्यक उपाययोजना करणे अपेक्षित आहे.

‘एस न्यूज’ ने प्रवाशांच्या समस्येला वाचा फोडल्यानंतर महामंडळाने घेतलेल्या या निर्णयामुळे प्रवाशांना काही काळासाठी दिलासा मिळाला असला, तरी १ ऑक्टोबरपासून पुन्हा NCMC कार्डची सक्ती लागू होणार असल्याने त्यापूर्वी सर्व तांत्रिक अडचणी दूर होणार का, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

Scroll to Top