डॉ. अमित पाटील यांच्या अभ्यासातून सर्पवैविध्याची नवी नोंद; विषशास्त्रीय संशोधनाची गरज
कोल्हापूर : वन्यजीव सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या सर्पवैविध्याच्या दृष्टीने महत्त्वाची नोंद समोर आली आहे. हौशी सर्प अभ्यासक व बालरोगतज्ज्ञ डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील यांनी गगनबावडा परिसरातील एका गावाजवळ अतिदुर्मीळ मानल्या जाणाऱ्या ‘ब्लॅक किंवा स्ट्राईप्ड कोरल स्नेक’च्या ‘खंडालेन्सिस’ (Calliophis nigrescens khanallensis) या रंगभिन्न प्रकाराची नोंद केली आहे. याच प्रकारातील दोन साप यापूर्वी याच परिसरात मृतावस्थेत आढळल्याचेही त्यांनी सांगितले.
डॉ. पाटील यांनी सापाची विविध छायाचित्रे घेत त्याच्या ओळखीबाबत उपलब्ध ऑनलाइन संदर्भांचा अभ्यास केला. तसेच प्रसिद्ध सर्पतज्ज्ञ डॉ. वरद गिरी यांचे मार्गदर्शन घेतल्यानंतर हा साप ‘Calliophis nigrescens’ या प्रजातीतील ‘khanallensis’ हा रंगभिन्न प्रकार असल्याचे निष्पन्न झाल्याचे त्यांनी सांगितले.
कोल्हापूर जिल्ह्यात यापूर्वी ‘कॅस्टोचा कोरल स्नेक’ या प्रजातीची नोंद झाली आहे. मात्र, सध्या आढळलेला साप त्यापेक्षा वेगळ्या प्रकारातील असल्याचे डॉ. पाटील यांच्या अभ्यासातून समोर आले आहे. उपलब्ध संदर्भांनुसार कोल्हापूर जिल्ह्यात या प्रकाराची प्रकाशित अधिकृत नोंद आढळून येत नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
१९१३ मध्ये खंडाळ्यात झाली होती पहिली नोंद…
‘खंडालेन्सिस’ या प्रकाराचे वर्णन प्रसिद्ध सर्पतज्ज्ञ वॉल यांनी १९१३ मध्ये खंडाळा परिसरातून केले होते. याच ठिकाणावरून या प्रकाराला ‘खंडालेन्सिस’ हे नाव मिळाले. या प्रकारात पाठीवरील पट्टे अत्यंत अस्पष्ट किंवा जवळजवळ नसतात. सापाचा रंग निळसर किंवा हिरवट काळा आणि जवळपास एकसंध दिसतो.
‘Calliophis nigrescens’ प्रजातीतील हे साप एलॅपिडी कुळातील विषारी साप आहेत. त्यांचे शरीर बारीक व दंडगोलाकार असून पाठीचा रंग गडद निळसर काळा, राखाडी काळा किंवा जांभळट तपकिरी असू शकतो. पोटाची बाजू चमकदार लाल किंवा केशरी असणे हे या सापाचे ठळक वैशिष्ट्य आहे. पावसाळ्यात दमट ठिकाणी, कुजलेल्या पानांच्या थराखाली तसेच ओढ्यांच्या काठावर त्यांचा अधिवास आढळतो. हे साप प्रामुख्याने इतर लहान सापांवर उपजीविका करतात.
विषशास्त्रीय अभ्यासाची गरज…
या सापाच्या विषाचा स्वतंत्र आणि सविस्तर शास्त्रीय अभ्यास अद्याप प्रकाशित झालेला नसल्याने त्याची नेमकी विषारी क्षमता निश्चितपणे सांगता येत नाही. ‘Calliophis’ वंशातील काही प्रजातींच्या विषामध्ये मज्जासंस्थेवर परिणाम करणारी विषद्रव्ये आढळतात; मात्र विषाची तीव्रता प्रजातीनुसार बदलू शकते. त्यामुळे या प्रजातीच्या विषाचा स्वतंत्र विषशास्त्रीय अभ्यास होणे आवश्यक असल्याचे डॉ. पाटील यांनी नमूद केले.
हा साप स्वभावाने लाजाळू असल्याने त्याचा मानवाशी संपर्क क्वचितच येतो. मात्र, विषारी साप असल्याने त्याला हाताळणे टाळावे आणि सर्पदंश झाल्यास तातडीने वैद्यकीय उपचार घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
पश्चिम घाट हा जैवविविधतेने समृद्ध प्रदेश असून, या दुर्मीळ सापाच्या नोंदीमुळे कोल्हापूर परिसरातील सर्पवैविध्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. दुर्मीळ प्रजातींच्या अधिकृत नोंदी, त्यांचे संवर्धन आणि त्यांच्या विषाचा शास्त्रीय अभ्यास यासाठी भविष्यात अधिक संशोधनाची आवश्यकता असल्याचे डॉ. अमित पाटील यांनी सांगितले.


