मुंबई – राज्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या औषध निरीक्षक, गट-ब पदाच्या परीक्षेचा पेपर फुटल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. या पेपर फुटीमुळे संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याची वेळ आयोगावर आली आहे.
या प्रकरणी मुबई गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. मुंबई गुन्हे शाखेने एमपीएससीच्या तीन अधिकाऱ्यांसह सहा जणांना अटक केली आहे. औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणात एमपीएससीचे अप्पर सचिव अभिजीत लेंडवे यांना अटक करण्यात आली आहे. यावेळी एमपीसीचे दोन सहायक कक्ष अधिकारी गोपाळ मराठे आणि विश्वेवर नकाते यांनाही अटक करण्यात आली आहे. तसेच परीक्षार्थी ऋतुजा पाटील संशयाच्या भोवऱ्यात आहे. तिचे वडील अमृत पाटील आणि पेपर फुटीचा सूत्रधार प्रवीण पाटील यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. या सगळ्यांना 2 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.




