जिजाऊ ब्रिगेडच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षापदी वनिता निंबाळकर; तर चारुशीला पाटील विभागीय कार्याध्यक्षा
कोल्हापूर : मराठा सेवा संघ-जिजाऊ ब्रिगेडच्या कोल्हापूर जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने शिवमती वनिता निंबाळकर यांची जिल्हाध्यक्षापदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच माजी जिल्हाध्यक्षापदी शिवमती चारुशीला पाटील यांची विभागीय कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा शिवमती सीमाताई बोके, प्रदेश कार्याध्यक्षा शिवमती शितोळे, प्रदेश संघटक शिवमती बोराडे, शिवमती शीतल मोरे तसेच विभागीय अध्यक्षा शिवमती गोविलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व मंजुरीने या नियुक्त्यांची घोषणा करण्यात आली.
कोल्हापूर जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार आणि संघटनेचे कार्य तळागाळातील महिलांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचविण्याच्या उद्देशाने दोन जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यातील विविध भागांमध्ये कामाचे प्रभावी विभाजन होऊन जिजाऊ ब्रिगेडच्या कार्याला अधिक गती मिळेल, असा विश्वास प्रदेश नेतृत्वाने व्यक्त केला.
नियुक्तीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना नवनियुक्त जिल्हाध्यक्षा वनिता निंबाळकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी तसेच महिलांच्या हक्क आणि सक्षमीकरणासाठी कोल्हापूर जिल्ह्यात कटिबद्धपणे कार्य करणार असल्याचे सांगितले.
यावेळी विभागीय कार्याध्यक्षा चारुशीला पाटील, जिल्हा सचिव सुमन वागळे, जिल्हा कार्याध्यक्षा स्मिता कोकाटे, शहराध्यक्ष त्वरिता पाटील यांच्यासह जिल्ह्यातील माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.