'थकीत पगार काढून देतो, पण २५ हजार द्या'; महापालिकेचा प्रशासन अधिकारी अँटी करप्शन च्या जाळ्यात

<p>'थकीत पगार काढून देतो, पण २५ हजार द्या'; महापालिकेचा प्रशासन अधिकारी अँटी करप्शन च्या जाळ्यात</p>

कोल्हापूर : थकीत पगार व वेतनफरक मंजूर करून देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील प्रशासन अधिकारी दगडु चंद्राप्पा कुंभार (वय ५२) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईमुळे महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.

तक्रारदार हे आंतरजिल्हा बदलीवर कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत असलेल्या शाळेत कार्यरत आहेत. त्यांचा थकीत पगार आणि वेतनफरक मंजूर करून देण्यासाठी प्रशासन अधिकारी कुंभार यांनी सुरुवातीला ४० हजार रुपयांची मागणी केली होती. याबाबत तक्रारदारांनी एसीबीकडे धाव घेतली.

एसीबीने तक्रारीची पडताळणी केली असता, आंतरजिल्हा बदलीसाठी आवश्यक नाहरकत प्रमाणपत्र देताना कुंभार यांनी यापूर्वी १० हजार रुपये स्वीकारल्याची बाब समोर आली. त्यानंतर थकीत पगार व वेतनफरक मंजूर करून देण्यासाठी तडजोडीअंती २५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले.

यानंतर एसीबीने सापळा रचला. पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत तक्रारदारांकडून २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना दगडु कुंभार यांना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पोलीस उपआयुक्त तथा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप व त्यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.