हनुमान नगरातील व्यावसायिकाचा विहिरीत मृतदेह आढळल्याने खळबळ; आत्महत्या की घातपात?

<p>हनुमान नगरातील व्यावसायिकाचा विहिरीत मृतदेह आढळल्याने खळबळ; आत्महत्या की घातपात?</p>

शिये येथील हनुमान नगर परिसरातील रहिवासी व आर.एफ. चिकन सेंटरचे व्यावसायिक फिरोज खानसो मुजावर (वय ४३) यांचा मृतदेह शिरोली एमआयडीसी परिसरातील एका विहिरीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आत्महत्या की घातपात, याबाबत पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हनुमान नगरमधून एमआयडीसीकडे जाणाऱ्या मार्गावर आर.एफ. चिकन सेंटरच्या माध्यमातून चिकन विक्रीचा व्यवसाय करणारे फिरोज मुजावर हे शुक्रवारी सायंकाळी राहत्या घरातून बाहेर पडले होते. मात्र, शनिवारीपर्यंत ते कुठेही दिसून न आल्याने त्यांचा मुलगा फरान मुजावर याने वडील बेपत्ता झाल्याची नोंद पोलिसांत केली होती. त्यानंतर कुटुंबीय आणि मित्रमंडळी गेल्या दोन दिवसांपासून त्यांचा शोध घेत होते.

दरम्यान, आज सकाळी शिरोली एमआयडीसीतील मंत्री मेटॅलिक्स कंपनीच्या मागील बाजूस असलेल्या शेतवड परिसरातील एका विहिरीत मृतदेह पाण्यावर तरंगताना शेतकऱ्यांना आढळून आला. शेतकऱ्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला.

शिरोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा तपास सुरू असून मृतदेहाची ओळख फिरोज मुजावर अशी पटली आहे.

प्रथमदर्शनी मृताच्या डोक्यावर व पाठीवर जखमा असल्याचे निदर्शनास आल्याने या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे हा प्रकार आत्महत्येचा आहे की घातपाताचा, याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.

फरान मुजावर यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, घरामध्ये काही नातेवाईकांसोबत कौटुंबिक वाद सुरू होते. या पार्श्वभूमीवर या घटनेचा संबंध आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत.