राजकीय

मंत्री शिरसाटांनी मातंग समाजाच्या ट्रेनिंग सेंटरसाठी लाच मागितल्याचा सामाजिक कार्यकर्त्यांचा पत्रकार परिषदेत आरोप

pnigave 2 मिनिटे वाचन
शेअर करा

मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांचं प्रशासनावर आणि मंत्र्यांवर कोणतंही नियंत्रण नाही : खा. संजय राऊत

छत्रपती संभाजीनगर – आज छत्रपती संभाजीनगरमध्ये खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद होती. यावेळी लातूरच्या उदगीर येथील सामाजिक कार्यकर्ते नरसिंग उदगीरकर यांनी,राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी लाच घेतल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

नरसिंग उदगीरकर यांनी, मातंग समाजासाठीच्या ट्रेनिंग सेंटरसाठी मंत्री संजय शिरसाट यांनी पाच कोटी रुपयांची लाच मागितल्याचे म्हटले आहे. यावर खा. संजय राऊत यांनी, भरोश्याच्या म्हशीला टोणगा व्हावा, तसा कारभार मुख्यमंत्र्यांचा सुरु आहे. मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांचं प्रशासनावर आणि मंत्र्यांवर कोणतंही नियंत्रण नाही. भ्रष्टाचारात महाराष्ट्र हे देशात नंबर एकचं राज्य झालं आहे. लातूरचे सामाजिक कार्यकर्ते नरसिंग उदगीरकर काल मला संभाजीमध्ये आल्यानंतर भेटले. ते मातंग समाजाचे नेते आहेत. त्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने लातूरमध्ये ट्रेनिंग सेंटर उभारण्यासाठी प्रस्ताव सादर केला, सर्व कागदपत्रांची पूर्तता केली. साधारण २५ कोटी रुपयांचं हे ट्रेनिंग सेंटर आहे. ट्रेनिंग सेंटरच्या मंजुरीसाठी उदगीरकर हे सामाजिक न्याय विभागात वारंवार हेलपाटे मारत राहिले. एके दिवशी मंत्र्यांचे ओएसडी सिद्धार्थ भंडारे म्हणाले मंत्र्यांना भेटल्याशिवाय तुमचं काम होणार नाही. मंत्र्यांनी उदगीरकरांना खासगी निवासस्थानी बोलावलं. समोरासमोर बसून त्यांनी पाच कोटी रुपयांची लाच मागितली.
त्यावर उदगीरकर यांनी, ”हा विषय मातंग समाजाचा आहे, पाच कोटी रुपये मी कुठून देऊ? मला ते शक्य नाही.” अशी बाजू मांडली. हे ऐकल्यानंर मंत्री संजय शिरसाट यांनी तुझा प्रस्ताव मंजूर होऊ शकणार नाही, असं सांगून टाकलं. एकनाथ शिंदेंनी हे तथ्य तपासलं पाहिजे. नरसिंग उदगीरकरांना शिंदेंनी बोलावून घेतलं पाहिजे, अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

संबंधित विषय

Scroll to Top