इचलकरंजी – शहरातील प्रमुख मार्ग सध्या भगव्या रंगाच्या सजावटीने आणि आकर्षक रोषणाईने उजळून निघाला आहे. शिवतीर्थ शंभूतीर्थ ते गांधी पुतळा अशा सुमारे चार किलोमीटरच्या मार्गावर महापालिकेच्यावतीने कमानी उभारण्यासह सजावट करण्यात आली आहे. या सजावटीमुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली असली, तरी याच सजावटीच्या खर्चावरून विरोधकांनी प्रशासनाला धारेवर धरले आहे.
राज्यामध्ये दुष्काळी परिस्थिती असताना मुख्यमंत्री आपले अनेक कार्यक्रम रद्द करून दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी आवाहन करत आहेत. अशा परिस्थितीत इचलकरंजी महापालिका प्रशासनाकडून सजावटीसाठी २५ ते ३० लाख रुपये खर्च करण्याची गरज काय, असा सवाल विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केला आहे.
तात्पुरत्या सजावटीवर एवढी मोठी रक्कम खर्च करण्यापेक्षा याच पैशातून शहरात कायमस्वरूपी आकर्षक विद्युत रोषणाई करता आली असती आणि शहर सौंदर्याकरणासाठी दीर्घकाळ फायदा झाला असता. मग महापालिका प्रशासन, महापौर आणि आयुक्त यांनी असा खर्च करण्याचा निर्णय का घेतला? तसेच स्थानिक आमदारही या खर्चाकडे दुर्लक्ष का करत आहेत, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे.
एकीकडे शहराच्या सौंदर्यात भर घालणारी सजावट, तर दुसरीकडे खर्चाच्या औचित्यावरून उपस्थित होणारे प्रश्न, यामुळे इचलकरंजीच्या राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटले आहे.




