इतर

रॅपिडो विरोधात कोल्हापुरातील रिक्षा संघटना आक्रमक…

एस न्यूज प्रतिनिधी 2 मिनिटे वाचन
शेअर करा

 आरटीओ कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

कोल्हापूर – जिल्ह्यात जवळपास २४ हजार तर शहरात ९ हजार ५०० रिक्षा व्यावसायिक आहेत. या रिक्षा व्यवसायिकांमध्ये प्रवासी वाहतुकीवरून आधीच स्पर्धा आहे. या व्यवसायावर हजारो कुटुंबं चालतात. आता या व्यवसायाला रॅपिडोशी स्पर्धा करावी लागत आहे. रॅपिडोने व्यवसायासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे रीतसर परवानगी मागितलेली नाही तरी देखील गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर शहरात रॅपिडो अॅपच्या माध्यमातून काही जण दुचाकी प्रवासी वाहतूक करत आहेत. याबाबत रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींना माहिती मिळाली. काही रिक्षा व्यावसायिकांनी हे अॅप डाऊनलोड करून घेतले. या माध्यमातून त्यांनी मंगळवारी सायंकाळी रॅपिडोच्या प्रतिनिधींना प्रवासी वाहतुकीच्या नावाखाली मध्यवर्ती बस स्थानक परिसरात बोलावून घेतले आणि विनापरवाना व्यवसाय करत असल्याबाबत त्यांना जाब विचारून शाहूपुरी पोलिसांच्या स्वाधीन केले.

पोलिसांनी रॅपिडोच्या दोन व्यवसायिकांची वाहने ताब्यात घेतली आहेत. या प्रकरणी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकाऱ्यांशी रिक्षा संघटनेच्या प्रतिनिधीनी संपर्क साधला. मात्र या रॅपिडो विरोधात तक्रार देण्यासाठी ते पुढे आले नाहीत. दरम्यान रॅपिडो अॅपच्या माध्यमातून बेकायदा वाहतूक करणाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी रिक्षा चालक चंद्रकांत भोसले यांनी केली आहे.

 दरम्यान या प्रश्नावर रिक्षा संघटनेचे राजू जाधव, चंद्रकांत भोसले, अतुल पवार, भागवत घोडके, राहुल पवार, अविनाश दिंडे, राकेश गायकवाड, अरुण घोरपडे, शाहरुख बागवान, समाधान कांबळे, रेहान मुजावर, नागेश बुचडे, फैयाज काझी, जीशान मुजावर, इम्तियाज मुजावर यांनी आज उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मनोज ओतारी यांची भेट घेतली.

यावेळी मनोज ओतारी यांनी, रॅपिडो अॅप संदर्भात निश्चित धोरण करू, अशी ग्वाही दिली. तसेच शासनाच्या नियमावलीनुसार कागदपत्रांची पूर्तता करून रॅपिडो अॅपच्या माध्यामातून वाहतूक करावी, बेकायदा वाहतूक केल्यास कारवाई करू, असा इशारा दिला.

दरम्यान प्रादेशिक परिवहन कार्यालयात निरीक्षकांची बैठक घेवून रॅपिडो अॅपच्या माध्यमातून बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मनोज ओतारी यांनी सांगितले.

संबंधित विषय

Scroll to Top