कोल्हापूर – यंदाच्या मोसमी पावसावर एल निनोचे सावट स्पष्टपणे दिसून आला आहे. जून ते सप्टेंबर या हंगामात राज्यात तुटीचा पाऊस झाला आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी आलेली भात, भूईमूग, सोयाबीन पिके वाया गेली आहेत. मात्र संपूर्ण राज्यात दुष्काळ असताना शासनाने काही तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केलेत. त्यामुळे शासनाने संपूर्ण राज्यात दुष्काळ जाहीर करावा तसेच संविधानाची पायमल्ली करणारे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घ्यावा या मागण्यांसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी चले जाव, चले जाव, ज्ञानेश कुमार चले जाव, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
याप्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील यांनी, प्रशासनाला जाग आणण्यासाठी येत्या आठ तारखेला एक दिवशीय लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे सांगितले.
यावेळी शेतकऱ्यांचे सर्व कर्ज माफ करावे, कृषी पंपांची सर्व वीज बिले माफ करावीत, रोजगार हमी योजनेतील निकष शिथिल करून तातडीने रोजगाराची कामे सुरू करा, पिण्याच्या पाण्यासाठी टँकर मंजूर करण्याचा अधिकार तहसीलदारांना आदि मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.
या आंदोलनात बाजीराव खाडे, अनिल घाटगे, रावसाहेब भिलवडे, अश्विनी माने, गणेश जाधव, निरंजन कदम यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.




