चक्रेश्वरवाडीत भुयाराच्या स्वच्छतेदरम्यान आढळलं लहान द्वार… संशोधनाची मागणी

कोल्हापूर – सह्याद्रीच्या कुशीत वसलेला राधानगरी तालुका म्हणजे निसर्ग, अध्यात्म आणि प्राचीन इतिहासाचा अनोखा संगम. तालुक्यातील चक्रेश्वरवाडी येथील चक्रेश्वर मंदिर,  तपसा आणि चक्रेश्वर डोंगर परिसर आज पुन्हा एका प्राचीन रहस्यामुळे चर्चेत आले आहे. भगवा बॉईज आणि राजे फ्रेंड सर्कलच्यावतीने चक्रेश्वर मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी गणेश तरुण मंडळाच्या काही कार्यकर्त्यांनी मंदिराजवळील भुयारातील साचलेला गाळ काढून स्वच्छता करण्याचा प्रयत्न केला.

गाळ हटवल्यानंतर भुयाराच्या पुढील बाजूस लहानसे द्वार असल्याचे दिसून आले. त्यामुळे या ठिकाणी आणखी काही प्राचीन रचना किंवा गुहेचा भाग असण्याची शक्यता व्यक्त होतीय मात्र, या रचनेचे नेमके स्वरूप आणि ऐतिहासिक महत्त्व शास्त्रीय अभ्यासातूनच स्पष्ट होऊ शकते.

चक्रेश्वर मंदिर ते तपसा या परिसरात प्राचीन काळी ऋषीमुनी साधना करीत असत आणि मंदिरापासून तपसा येथे जाण्यासाठी भुयारी मार्गाचा वापर केला जात असे, अशी स्थानिक आख्यायिका आहे. तपसा येथे  वास्तव्यास असलेले ८६ वर्षीय गंगागिरी बुवा महाराज यांनीही या परिसरात भुयार असल्याच्या आख्यायिकेला दुजोरा दिला. पूर्वी साधनेसाठी येणारे ऋषीमुनी या भुयारी मार्गाचा वापर करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

चक्रेश्वर मंदिर, तपसा आणि चक्रेश्वर डोंगर परिसर केवळ धार्मिक श्रद्धेचे केंद्र नाही, तर प्राचीन संस्कृतीच्या पाऊलखुणा जपणारा ऐतिहासिक ठेवा म्हणूनही महत्त्वाचा आहे. परिसरातील शिलालेख, प्राचीन वास्तूंचे अवशेष, डोंगररचना आणि विविध आख्यायिका या भागाच्या समृद्ध वारशाची साक्ष देतात. अश्मयुगीन संस्कृतीशी संबंधित पाऊलखुणा आणि प्राचीन मानवी वस्तीच्या अभ्यासाच्या दृष्टीनेही या परिसराकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. मंदिराजवळील भुयार हे केवळ एक धार्मिक कुतूहल न राहता प्राचीन इतिहासाचा महत्त्वपूर्ण दुवा ठरू शकते. त्यासाठी या ठिकाणी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन सुरक्षित पद्धतीने सर्वेक्षण, दस्तऐवजीकरण आणि संशोधन होणे आवश्यक आहे.

Scroll to Top