कामात दिरंगाई करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा
इचलकरंजी – महानगरपालिकेवर गेल्या काही वर्षांपासून प्रशासकीय राजवट होती. त्यामुळे महापालिकेचा कारभार प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुरू होता. मात्र सार्वत्रिक निवडणूकीनंतर महापौर, उपमहापौर आणि नगरसेवकांच्या माध्यमातून महापालिकेचे कामकाज सुरू झाले आहे. नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवणे, प्रलंबित विकास कामांना गती देणे आणि विविध विभागांशी संबंधित प्रश्न मार्गी लावणे, यासाठी लोकप्रतिनिधींकडून प्रशासनाला सूचना दिल्या जातात. मात्र, काही वरिष्ठ अधिकारी लोकप्रतिनिधींनी सांगितलेल्या कामांकडे गांभीर्याने पाहत नसल्याच्या तक्रारी समोर येत असल्याची चर्चा आहे. काही कामे सांगूनही त्यावर अपेक्षित कार्यवाही होत नसल्याने लोकप्रतिनिधींमध्ये नाराजी आहे.
या पार्श्वभूमीवर महापौर उदय धातुंडे यांनी, महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या कामकाजाकडे लक्ष केंद्रित केल्याची माहिती समोर आली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कामकाजाबाबत विशेष नाराजी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळती आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात समन्वय राहणे गरजेचे असताना, कामात दिरंगाई होत असेल तर त्याची जबाबदारी निश्चित केली जाईल, अशी भूमिका महापौरांनी घेतली आहे. कामात जाणीवपूर्वक दिरंगाई करणाऱ्या किंवा वरिष्ठांच्या आदेशांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशाराही महापौर उदय धातुंडे यांनी दिला आहे. त्यामुळे आता महापालिकेतील त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर नेमकी कोणती कारवाई होते, याकडे इचलकरंजीकरांचे लक्ष लागले आहे.




