आम्ही संपर्क साधायचं तरी कोणाशी…: रुग्णांकडून संताप
कोल्हापूर – शहरातील ताराबाई पार्क येथील ईएसआयसी रुग्णालयात लाखोहून अधिक कामगार उपचार घेत आहेत. कामगारांना आरोग्य सुविधा मिळाव्यात, या मुख्य उद्देशाने या ईएसआयसी रुग्णालयाची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे उपचार घेण्यासाठी खूप लांबून रुग्ण दररोज येत असतात. परंतु या रुग्णालयात सर्वसामान्य रुग्णांना संपर्क साधण्यासाठी लैंडलाईन फोनच उपलब्ध नसल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे.
गेल्या तीन महिन्यापासून या रुग्णालयातील लैंडलाईन फोन बंद अवस्थेत असल्याने रुग्णालयाशी संपर्क साधण्यासाठी आम्ही कोणाशी संपर्क साधायचा, कोणाला फोन करायचं. तसेच शहराच्या बाहेरील बाजूस हे ईएसआयसी रुग्णालय असल्याने रुग्णांना मोठी कसरत करत रुग्णालयापर्यंत पोहचावे लागते आहे. त्यामुळे रुग्णांसह नातेवाईमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
याबाबत रुग्णालयातील संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, गेल्या महिन्या भरापासून बीएसएनएल कार्यालयाशी आम्ही संपर्कात आहोत. फक्त वायरची समस्या असल्याचं सांगितले जात आहे. त्यामुळे रुग्णांच्या या समस्येकडे कोणी लक्ष देणार आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.




