इचलकरंजीत नियमबाह्य फॅन्सी नंबर प्लेट लावणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई

इचलकरंजी – शहरात वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये फेरफार करून फॅन्सी नंबर, आकर्षक अक्षरे, आकडे तसेच विविध चिन्हांचा वापर करण्याचे प्रकार वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक शाखेने विशेष कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली १९ आणि २० ऑगस्ट या दोन दिवसांच्या कालावधीत नियमबाह्य नंबर प्लेट असलेल्या एकूण ४५ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. संबंधित वाहनचालकांकडून एकूण २२ हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. कारवाई दरम्यान ३३ फॅन्सी नंबर प्लेट जमा करण्यात आल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, फॅन्सी आणि नियमबाह्य नंबर प्लेट तयार होण्यास प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने शहर वाहतूक शाखेने नंबर प्लेट तयार करणारे विक्रेते आणि व्यावसायिकांची बैठक घेतली.

या बैठकीत वाहनांसाठी नियमबाह्य, फॅन्सी, आकर्षक अथवा सुस्पष्ट नसलेल्या नंबर प्लेट तयार करू नयेत, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. याचे उल्लंघन केल्यास संबंधित विक्रेते आणि व्यावसायिकांविरुद्ध कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

Scroll to Top