आपल्या विविध मागण्यांसाठी साखर कामगारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर इशारा मोर्चा

कोल्हापूर – साखर कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ आणि महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघ यांच्यावतीने आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर कामगारांनी इशारा मोर्चा काढला.

सकाळी दहा वाजता मोर्चाला बिंदू चौकातून सुरवात झाली. यावेळी कामगारांनी बीआयआर अॅक्ट पूर्ववत करावा, साखरेची आधारभूत किंमत वाढवावी, अशा जोरदार घोषणा दिल्या. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, सरचिटणीस राऊसाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, कार्याध्यक्ष अविनाश आपटे,  राजेंद्र चव्हाण, नितीन बेनकर, अशोक बिराजदार आदींनी मनोगतं व्यक्त केली.

महाराष्ट्र औद्योगिक संबंध अधिनियम १९४७ अर्थात बीआय आर अॅक्ट हा कायदा पूर्ववत करावा, साखर कामगारांचे थकीत वेतन अदा करावे, बंद आणि आजारी साखर कारखाने सुरू करून तिथल्या कामगारांचे पुनर्वसन करावे आणि रोजंदारी तसेच कंत्राटी कामगारांना कारखान्याच्या सेवेत समाविष्ट करून वेतनश्रेणी लागू करावी, अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या. या मागण्यांबाबत शासनाने तातडीने सकारात्मक भूमिका घ्यावी,  अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा कामगार संघटनांकडून देण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे आणि सरचिटणीस राऊसाहेब पाटील यांनी मागण्या मान्य झाल्या शिवाय एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही, असा इशारा यावेळी दिला.

दरम्यान, कोल्हापूर महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रवीण केसरकर, नगरसेवक राहुल माने, विनायक फाळके आणि संजय पटकारे यांनीही मोर्चात सहभागी होत साखर कामगारांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवला. या मोर्चात प्रदीप बनगे, युवराज रणवरे, प्रदीप शिंदे, दत्तात्रय निमसे, राजेंद्र तावरे, सयाजी कदम, संजय मोरबाळे, संजय पाटील, योगेश हंबीर यांच्यासह साखर कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Scroll to Top