काळम्मावाडी धरण ९५ टक्के भरलं..!

२०२२ नंतर धरणात प्रथमच मोठा जलसाठा

कोल्हापूर – काळम्मावाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत पाणलोट क्षेत्रात ४२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, १ जूनपासून आजअखेर तब्बल २ हजार ६१० मिलिमीटर पाऊस झाला आहे.

सध्या पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी धरणात पाण्याची आवक सुरूच आहे. सध्या धरण ९५ टक्के भरले असतानाही अद्याप सर्व्हिस गेटमधून कोणताही विसर्ग करण्यात आलेला नाही. त्यामुळे धरणातील वाढता जलसाठा प्रशासनासह परिसरातील शेतकरी आणि नागरिकांसाठी दिलासादायक ठरत आहे. विशेष म्हणजे, धरणाच्या गळतीमुळे यापूर्वी धरण पूर्ण क्षमतेने भरण्यावर मर्यादा येत होत्या. मात्र, गळती कमी करण्यासाठी करण्यात आलेल्या ग्राऊटिंगच्या कामामुळे यंदा पाणीसाठा मोठ्या प्रमाणात वाढण्यास मदत झाली आहे. त्यामुळे २०२२ नंतर प्रथमच काळम्मावाडी धरणाने ८० टक्क्‌यांची पातळी ओलांडत ९५ टक्क्यांपर्यंत मजल मारली आहे. या धरणातून कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांना तसेच कर्नाटकातील सीमाभागाला पिण्याचे पाणी आणि शेतीसाठी सिंचनाचा पुरवठा केला जातो. वाढलेला जलसाठा हा दोन राज्यांतील हजारो नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी दिलासा ठरत आहे.

Scroll to Top