जॉनी ट्रेनर जीवनगौरव पुरस्कार अनिल वेल्हाळ यांना जाहीर

कोल्हापूर –कोल्हापूर प्रेस क्लब अंतर्गत कार्यरत प्रेस फोटोग्राफर क्लबच्या वतीने उद्या 19 ऑगस्ट रोजी ‘जागतिक फोटोग्राफी दिना निमित्त
कोल्हापुरातील दिवंगत ज्येष्ठ प्रेस फोटोग्राफर जॉनी ट्रेनर यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा ‘जॉनी ट्रेनर जीवनगौरव पुरस्कार देवून ज्येष्ठ पत्रकार अनिल वेल्हाळ यांना सन्मानित करण्यात येणार आहे. जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे चेअरमन ललित गांधी आणि प्रसिद्ध फोटोग्राफर पद्मश्री सुधारक ओलवे यांच्या प्रमुख उपस्थितीत राजर्षी शाहू स्मारक भवनात पुरस्कार वितरण समारंभ बुधवारी सकाळी 11 वाजता संपन्न होणार आहे.


वेल्हाळ यांनी प्रेस फोटोग्राफर म्हणून पस्तीस वर्षाहून अधिक काळ काम केले आहे. पुढारी, सकाळ, तरुण भारत, लोकसत्ता, केसरी अशा विविध दैनिकात त्यांची अनेक छायाचित्रे परिणामकारक ठरली आहेत. निपाणीचं तंबाखू आंदोलन ते नर्मदा बचाव आंदोलन आणि इतर सामाजिक आंदोलनांची त्यांनी केलेली फोटोग्राफी आजही लोकांच्या स्मरणात आहे.
या वर्षापासून दिवंगत प्रेस फोटोग्राफर संजय देसाई यांच्या स्मरणार्थ विशेष दृष्टी पुरस्कार देण्यात येणार आहे . हा पहिला पुरस्कार कोल्हापूरचे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांना देण्यात येणार आहे. या कार्यक्रमात पदमश्री सुधारक ओलवे त्यांच्या उत्कृष्ट छायाचित्रांचा ‘स्लाईड शो’ सादर करत ‘प्रेस फोटोग्राफी’ आणि ‘फोटोग्राफरने जपावयाचे सामाजिक भान’ तसेच मोबाईल फोटोग्राफी या विषयां वर मार्गदर्शन करणार आहेत.कोल्हापूर प्रेस फोटोग्राफर क्लबचे अध्यक्ष मोहन मेस्त्री यांनी ही माहिती दिली आहे.

Scroll to Top