प्राथमिक शिक्षक बँकेच्या सभेत गोंधळ 

 विरोधकांकडून आक्रमक भूमिका 

कोल्हापूर -  दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची 87 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज आर्यविन ख्रिश्चन सभागृहात संपन्न झाली. संस्थेचे अध्यक्ष शिवाजी रोडे पाटील यांचे भाषण सुरू असताना विरोधकांनी, ‘जुन्या कोणत्याही विषयावर बोलू नका अहवाल सालात काय केलं ते सांगा?’ अशी विचारणा करत सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतल्याने ही सभा वादळी ठरली. प्रश्नोत्तरे सुरू असताना समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने हुकूमशाही पद्धतीने सभा चालवली जात असल्याचा आरोप करत विरोधकांनी सभात्याग केला.

यावेळी विरोधी गटाचे सभासद संभाजी बापट, प्रसाद पाटील, राजमोहन पाटील यांनी थेट व्यासपीठावर जावून तुम्ही गेल्या तीन वर्षात काय केलं? ते सांगा, खोटी माहिती देवू नका, जुन्या विषयावर बोलू नका बँकेच्या ठेवी कमी का झाल्या?, सभासद संख्या कमी झाली? अशा प्रश्नांची विचारणा केली.

या गोंधळातच संस्थेचे कार्यकारी संचालक संजय मगदूम यांनी विषय पत्रिकेवरील विषय वाचन करत असताना सत्ताधारी गटाच्या सभासदांनी मंजूर मंजूर अशी घोषणाबाजी केली. यानंतर प्रश्नोत्तर दरम्यान दोन्ही बाजूनी घोषणाबाजी आणि गोंधळ सुरू झाल्यानंतर विरोधी गटाच्या सभासदांनी सभागृहातून बाहेर पडत सभात्याग केला.

सभागृहाच्या बाहेर विरोधी गटाच्या सभासदांनी एकत्र येत सत्ताधारी गटाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी विरोधी गटाचे सभासद संभाजी बापट आणि राजमोहन पाटील यांनी सत्ताधारी गटाने हुकूमशाही पद्धतीने सभा चालवण्याचा आरोप करत सत्ताधाऱ्यांचा निषेध नोंदवला.

यावेळी संभाजी बापट यांनी, सत्ताधारी गटाने चुकीचा नफा दाखवला आहे. यावर सरकारी लेखा परीक्षण अहवालात ताशेरे ओढले असल्याचं देखील सांगितले.

या सभेला संस्थेचे व्हाईस चेअरमन सुरेश कोळी यांच्यासह सर्व संचालक, सभासद उपस्थित होते.