शाहूवाडीतील कडवी उपसा सिंचन योजनेस मुख्यमंत्र्यांची मान्यता : आ. विनय कोरेंची माहिती
मुंबई – शाहूवाडी तालुक्यातील सावे येथील कडवी नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरुन शाहूवाडी तालुक्यातील वंचित क्षेत्रासाठी शासकीय खर्चातून प्रस्तावित कडवी उपसा सिंचन योजनेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिल्याची माहिती आ. विनय कोरे यांनी दिली आहे.
कडवी नदीवर सावे गावच्या हद्दीतून जुळेवाडी खिंडीत पाणी उपसाव्दारे उचलून बंदीस्त पाईपलाईनव्दारे लाभ क्षेत्राबाहेरील गावे पाणी दिले जाणार आहे. यामध्ये गोगवे, बजागेवाडी, करंजोशी, आरुळ, आंबर्डे, ओकोली, करपेवाडी, परखंदळे, सावर्डे, सोनवडे, शित्तूर, साळशी, पिशवी, सुपात्रे, खुटाळवाडी, बोरिवडे, आवळी, नावली, जेऊर, आपटी, बोरपाडळे यासह अनेक गावांमधील ५,००० ते ७,५०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याकरीता शासकीय खर्चाने उपसा सिंचन योजना राबवून बंद पाईपद्वारे पाण्याची वितरण व्यवस्था केली जाणार आहे.