दहा वर्षीय बालकाचा हृदयविकाराने मृत्यू,आईच्या मांडीवरच सोडला प्राण
कोल्हापूर - पन्हाळा तालुक्यातील कोडोलीमध्ये हृदयाला चटका लावणारी एक घटना घडली आहे. खेळता खेळता एका दहा वर्षांच्या चिमुकल्याचा आईच्या मांडीवरच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालाय. श्रावण गावडे असं या निरागस बालकाचं नाव असून गावात आणि परिसरात शोककळा पसरली आहे.
पन्हाळा तालुक्यातील कोडोली गावातील आनंदनगर येथील शिवनेरी गल्लीमध्ये गावडे कुटुंब राहतं. घरातील एकुलता एक मुलगा श्रावण अजित गावडे (वव १०) गल्लीतील गणेश मंडळाच्या शेडमध्ये मित्रांसोबत खेळत होता. खेळता खेळता अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागलं. श्रावण तातडीने धावत घरी आला आणि आईच्या मांडीवर डोकं टेकवलं. पण नियतीने वेगळाच निर्णय घेतला होता. काही क्षणांतच त्याला तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि त्याने आईच्या मांडीवरच अखेरचा श्वास घेतला.
श्रावण गावडे हा इयत्ता चौथीमध्ये शिकत होता. चार वर्षांपूर्वीच त्याच्या बहिणीचं निधन झालं होतं. आता या एकुलत्याचं अपघाती निधन झाल्यानं गावडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कोडोली गावात हळहळ व्यक्त होत असून, अनेकांनी गावडे कुटुंबाला धीर देण्यासाठी भेट दिली. "चार वर्षांपूर्वीच आमच्या कुटुंबाने मुलगी गमावली, आता एकुलता एक मुलगाही गेला… काही उरलं नाही." अशा भावना चुलते गजानन गावडे यांनी व्यक्त केल्या.