21 व्या पोलीस कर्तव्य मेळाव्यात पुणे ग्रामीण विभागाला विजेतेपद तर सातारा जिल्हा संघाला उपविजेतेपद

कोल्हापूर – कोल्हापुरातील अलंकार हॉलमध्ये  तीन ऑगस्टपासून पोलीस कर्तव्य मेळाव्याला प्रारंभ झाला. कोल्हापूरसह पुणे ग्रामीण, सांगली, सातारा,आणि  सोलापूर ग्रामीण या पाच जिल्ह्यातील 20 पोलीस अधिकारी आणि 85 पोलीस अंमलदार अशा एकूण 105 स्पर्धकांनी पोलीस कर्तव्य  मेळाव्या अंतर्गत आयोजित स्पर्धेत भाग घेतला होता.  बॉम्बशोधक आणि नाशक पथक, गुन्हे प्रकटीकरण, वाहनांचा शोध, संगणक साक्षरता, भक्कम पुरावे गोळा करण्याचा विविध प्रकारांबाबत स्पर्धेद्वारे परीक्षण करण्यात आलं. यामध्ये गुणांकनुसार पुणे ग्रामीण विभागानं  विजेतेपद तर सातारा जिल्ह्यानं  उपविजेते पटकावलं.

या स्पर्धेतील विजेत्यांना प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश आशिष पाटील आणि पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या हस्ते गौरवण्यात आलं. 22 व्या परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळाव्याचं  आयोजन सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते मेळाव्याचा ध्वज सोलापूर ग्रामीण जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांकडं सुपूर्द करण्यात आला.या  कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक निलोत्पल, महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारूड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जस्मिन, सातारा पोलीस अधीक्षक निखिल इंगळे, सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार जोशी, सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पुणे ग्रामीणचे संदीप गिल ,कोल्हापूरचे अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यासह  कोल्हापूर जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी आणि  पोलीस कर्मचारी  उपस्थित होते.

Scroll to Top