आंदोलन

इचलकरंजीत रिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालक-मालकांचा प्रांत कार्यालयावर मोर्चा

pnigave 2 मिनिटे वाचन
शेअर करा

इचलकरंजी – राज्यात सुरु असलेल्या रॅपिडो आणि उबरसारख्या सेवेमुळे इतर रिक्षाचालकांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याने रिक्षा चालक संघटनांनी आक्रमक होत आज राज्यव्यापी संप पुकारला आहे. महाराष्ट्रातील सुमारे २५ लाख रिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालक मालक संपात सहभागी झाले होते. या संपाला पाठिंबा देत इचलकरंजी शहर संयुक्त रिक्षा चालक-मालक कृती समितीच्यावतीने शहरात भव्य मोर्चा काढण्यात आला.

 हा मोर्चा इचलकरंजीतील शिवतीर्थ येथून सुरू होऊन शंभूतीर्थ मार्गे प्रांत कार्यालयावर धडकला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत रिक्षा चालकांनी प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. शासनाने चालकांच्या विविध समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने निर्णय घ्यावेत, अशी मागणी प्रांतधिकारी दीपक शिंदे यांच्याकडे करण्यात आली. या आंदोलनाच्या माध्यमातून अनधिकृत बाईक टॅक्सीवर पूर्ण बंदी घालावी, ओला, उबरसारख्या ऑनलाईन कॅब कंपन्यांचे भाडे आणि कार्यपद्धती निश्चित करावी, चालक-मालकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करून सामाजिक आणि आर्थिक सुरक्षा द्यावी, तसेच एटीएस सेंटर आणि परिवहन विभागातील कथित भ्रष्टाचाराला आळा घालावा, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या. याशिवाय चालकांसाठी सुरक्षित पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून द्यावी आणि परिवहन विभागातील प्रशासकीय अडचणी दूर कराव्यात, अशीही मागणी करण्यात आली. या मागण्यांबाबत शासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही संघटनेच्यावतीने देण्यात आला. मोर्चात रिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालक-मालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

संबंधित विषय

Scroll to Top