इचलकरंजी – गेल्या काही काळापासून इचलकरंजीतील शहीद भगतसिंग उद्यानातील घसरगुंड्या, झोके, बंद पडलेली रेल्वे आणि पाण्यातील बोट यासारख्या खेळण्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. त्यामुळे लहान मुलांच्या आनंदावर विरजण पडले होते. उद्यानाच्या विकासासाठी सहा महिन्यांपूर्वी महानगरपालिकेत ठराव मंजूर होऊनही प्रत्यक्ष कामाला मुहूर्त मिळत नव्हता. अखेर ही बाब लक्षात घेऊन नगरसेविका जुलेखा पटेकरी आणि जहांगीर पटेकरी यांनी स्वतः पुढाकार घेतला.
दिवाळीच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर पटेकरी दाम्पत्याने स्वखर्चातून मोडकळीस आलेल्या सर्व खेळण्यांची दुरुस्ती करत संपूर्ण उद्यानाचे सुशोभीकरण केले. या नूतनीकरणानंतर माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या हस्ते उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी हाळवणकर यांनी या लोकोपयोगी कामाबद्दल पटेकरी दाम्पत्याचे विशेष कौतुक केले.
सध्या दिवाळीच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी लहान मुले आणि पालक मोठ्या संख्येने उद्यानात येत आहेत. नव्याने दुरुस्त केलेल्या खेळण्यांचा आनंद घेणाऱ्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहता, पटेकरी दाम्पत्याने घेतलेल्या पुढाकाराला आणि प्रयत्नांना खऱ्या अर्थाने यश आले आहे.




