कोल्हापूर – गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी राज्यातील सर्व संपादक, पत्रकारांना पत्र लिहून लोकशाहीच्या रक्षणासाठी आवाज उठवण्याची विनंती केली आहे. आ. सतेज पाटील यांनी पत्रात म्हटले आहे कि, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण नेहमीच सत्याची बाजू मांडली आहे. म्हणूनच विश्वासाने हे पत्र लिहीत आहे. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांची निःस्वार्थ सेवा, डॉ. धनंजयराव गाडगीळ यांचे नेटके नियोजन आणि वैकुंठभाई मेहता यांची नैतिक शिस्त यातून महाराष्ट्रात सहकार उभा राहिला. शेतकरी हाच संस्थेचा खरा मालक असावा, हेच या सर्वांचे स्वप्न होते. आज गोकुळच्या माध्यमातून सहकाराच्या या गाभ्यावरच घाला घातला जात असल्याची भीती आमदार पाटील यांनी व्यक्त केली आहे .
पत्रात पुढे म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्ह्यातील साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांनी गोकुळच्या निवडणुकीत २५ पैकी १३ जागांवर समविचारी आघाडीला स्पष्ट बहुमत दिले. मात्र, २९ ऑक्टोबर रोजी झालेल्या अध्यक्ष निवडीच्या सभेला महायुतीच्या सर्व १२ संचालकांनी ठरवून गैरहजेरी लावली.आपला पराभव मान्य न करता निवड प्रक्रिया अडवण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.”जनतेचा कौल तांत्रिक कारणांनी रोखला जात असेल, तर मतदानाला अर्थ काय उरतो? केवळ गोकुळमधील बहुमतासाठी कायदा बदलण्याची किंवा शासन नियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार देऊन संख्याबळ फिरवण्याची चर्चा होत असेल, तर मग निवडणुका घ्यायच्याच कशाला?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.आज गोकुळसाठी आणला जाणारा असा कायदा उद्या महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही आणला जाऊ शकतो आणि स्वीकृत सदस्यांमार्फत लोकशाहीची गळचेपी केली जाऊ शकते, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.प्रशासकीय काळात गोकुळचा तोटा वाढत असताना लोकनियुक्त मंडळ अस्तित्वात नसणे हे महाराष्ट्राच्या सहकारासाठी लाजिरवाणे असल्याचे सांगत, त्यांनी विरोधी संचालकांना दूध उत्पादकांचा कौल स्वीकारून पुढील सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.”आज जे गोकुळमध्ये घडत आहे, ते उद्या कोणत्याही संस्थेत घडू शकते. महाराष्ट्रातील सहकाराचा वारसा जपण्यासाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी गोकुळच्या साडेपाच लाख शेतकऱ्यांचा आवाज बनून तुम्ही वास्तव जनतेसमोर मांडा,” अशी कळकळीची विनंती आमदार पाटील यांनी पत्राच्या शेवटी केली आहे.



