मुंबई – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आमदार संजय गायकवाड हे आपल्या अनेक वादग्रस्त वक्तव्याने नेहमीच चर्चेत असतात. परंतु यावेळी त्यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसा आदेशही जारी केल्याची माहिती मिळत आहे.
आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या अंत्यविधीला किंवा मयताला कोणीही जाऊ नये. जेव्हा लोकांना समजेल की, आपल्या मृतदेहाला जनावरे खातात आणि आपल्या मृतदेहाचे काय होते, तेव्हा ते आत्महत्या करणे थांबवतील. त्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले की, काही अडचण असल्यास त्यांनी आत्महत्या न करता सरकारला, आपल्या आमदार किंवा खासदारांना चिठ्ठी लिहून सांगावे. सर्वजण मिळून मदतीला धावून येतील. शेतकरी आत्महत्या करून आपल्या लहान मुलांचे आणि पत्नीचे आयुष्य उद्ध्वस्त करतात, असेही ते म्हणाले आहेत. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी,शेतकरी आपला अन्नदाता असून त्याच्याविरोधातील कोणतीही विधाने खपवून घेतली जाणार नाहीत, अशी तंबी देत संजय गायकवाड यांच्यावर शिवसेना पक्षातून निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर येत आहे.




