राजकीय

दुष्काळाचा फटका; केडीसीसी बँकेची निवडणूक लांबणीवर…?

एस न्यूज प्रतिनिधी अपडेट: 28 October 2026, 12:22 PM 1 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची (केडीसीसी) निवडणूक लांबणीवर पडणार आहे. दुष्काळ जाहीर केलेल्या जिल्ह्यांमधील सहकारी संस्थांच्या निवडणुका सध्या ज्या टप्प्यावर आहेत, त्याच टप्प्यावर पुढील आदेशापर्यंत स्थगित ठेवण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.

सहकार विभागाने २७ ऑक्टोबर २०२६ रोजी यासंदर्भात शासन आदेश जारी केला. खरीप हंगामातील पावसाची तूट आणि अन्य घटकांमुळे राज्यातील ३०४ तालुके दुष्काळी म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. या भागात दुष्काळ निवारणासाठी विविध उपाययोजना राबविण्याची गरज असून, त्यासाठी महसूल, कृषी, पशुसंवर्धन, सहकार, ग्रामविकास आणि अन्य विभागांवर अतिरिक्त प्रशासकीय जबाबदारी निर्माण झाली आहे.


दुष्काळ निवारणाच्या कामांसाठी शासकीय अधिकारी आणि कर्मचारी उपलब्ध राहावेत, तसेच दुष्काळग्रस्त शेतकरी व सभासदांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्याचा अतिरिक्त ताण येऊ नये, या उद्देशाने शासनाने हा निर्णय घेतला आहे.ज्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा टप्पा आदेशाच्या दिनांकापूर्वी सुरू झाला आहे, अशा संस्थांना या स्थगितीतून वगळण्यात आले आहे. तसेच उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेश दिलेल्या संस्थांनाही अपवाद लागू आहे.

केडीसीसीच्या निवडणुकीवर परिणाम..
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक या शासन निर्णया मुळे लांबणीवर पडणार आहे.

संबंधित विषय

Scroll to Top