महायुतीमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर
कोल्हापूर – पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत एकीकडे मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी धडपड सुरू असताना, दुसरीकडे राजकीय वर्तुळात ‘मलिद्याच्या’ वाटपावरून तीव्र असंतोष उफाळून आला आहे. महायुतीमध्ये एका बाजूला नाराजीचा सूर तीव्र झाला असून, नव्या पदाधिकाऱ्यांचा देखाव्यापुरता उत्साह आणि जुन्या कार्यकर्त्यांमधील उघड रोष यामुळे पक्षांतर्गत लाव्हा चव्हाट्यावर आला आहे.
मतदान केंद्र परिसरापासून ते शहराच्या कानाकोपऱ्यापर्यंत सध्या निवडणुकीतील मुद्द्यांपेक्षा ‘मलिद्याच्या’ घोळाचीच चर्चा तुफान रंगली आहे. निवडणुकीच्या नावाखाली बड्या मंडळींनी मलिद्यावर हात साफ केल्याचे बोलले जात असून, जमिनीवर अहोरात्र घाम गाळणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या तोंडाला मात्र पाने पुसली गेली आहेत. ज्यांच्या खिशात मलिदा पडला, ते ताकदीने आणि जोशात फिल्डिंग लावून कामात व्यस्त आहेत. मात्र ज्यांच्या पदरात काहीच पडले नाही, ते त्रस्त होऊन केवळ मरगळलेल्या चेहऱ्याने फिरत आहेत.
“मलिदा संपलाय, आता काहीच उरले नाही,” अशी थातुरमातुर कारणे आणि थापा मारून काही स्वार्थी नेत्यांनी हक्काच्या कार्यकर्त्यांची बोळवण केल्याची कुजबुज आता उघडपणे बोलली जात आहे. मतांची गोळाबेरीज करताना ज्यांच्या जीवावर निवडणुका लढवल्या जातात, त्यांनाच बाजूला सारत मलिद्याचा मलिदा लुटणाऱ्या या नेत्यांमुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे.
एका बाजूला लोकशाहीचा बडेजाव मिरवत मतदानाची धुरा सांभाळली जातीय , तर दुसऱ्या बाजूला मलिद्याच्या हिशेबावरून सुरू असलेल्या या लाजिरवाण्या प्रकारामुळे महायुतीच्या दांभिक राजकारणाचा पर्दाफाश झाला आहे. मलिद्याच्या या हिशेबाने आता पक्षात विसंवादाची मोठी खंदक खणली असून, याचा वणवा निवडणुकीच्या निकालावर किती पेट घेतो, हे लवकरच स्पष्ट होईल.




