कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीतील नवीद मुश्रीफ यांच्या पराभवावरून काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांना थेट सवाल केलाय. “महायुतीकडे चार हजार चारशे ठराव असल्याचं नेते सांगत होते, मग नावीद मुश्रीफ यांच्याविरोधात षड्यंत्र कोणी रचलं?” असा सवाल करत सतेज पाटील यांनी महायुतीतील नेत्यांवर निशाणा साधलाय. तसंच, मुश्रीफ यांनी आत्मचिंतन करून आगामी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीबाबतची भूमिका ठरवावी, असा सल्लाही त्यांनी दिलाय.
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपले पुत्र नावीद मुश्रीफ यांच्या पराभवामागे षड्यंत्र असल्याचा आरोप केला होता. या आरोपावर प्रतिक्रिया देताना आमदार सतेज पाटील यांनी महायुतीतील नेत्यांच्या दाव्यांचा संदर्भ देत प्रश्न उपस्थित केले.
निवडणुकीपूर्वी महायुतीतील नेते आपल्याकडे चार हजार चारशे ठराव असल्याचं सांगत होते. मग नावीद मुश्रीफ यांच्याविरोधात षड्यंत्र कोणी रचलं, याचा शोध मुश्रीफ यांनी घ्यावा, असं सतेज पाटील म्हणाले.
“संशयाची सुई महायुतीतील नेत्यांकडेच!”…
गोकुळ निवडणुकीतील केंद्रनिहाय मतदानाची आकडेवारी आता समोर आली आहे. मुश्रीफ यांनी केलेल्या षड्यंत्राच्या आरोपाच्या अनुषंगाने संशयाची सुई महायुतीतील नेत्यांभोवतीच फिरत असल्याचं वक्तव्य सतेज पाटील यांनी केलं. त्यांच्या या विधानामुळे कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, केंद्रनिहाय मतमोजणीमध्ये पन्हाळा -शाहुवाडी तालुक्यातून नावीद मुश्रीफ यांना सर्वात कमी मत्ताधिक्य मिळाल्याचं चित्र दिसत असून आमदार विनय कोरे यांच्या मतदारांनी धोका दिल्याची राजकीय चर्चा महायुतीत सुरुय. त्यामुळे गोकुळच्या सत्तास्थापनेनंतर आता महायुतीतील राजकीय समीकरणांमध्ये कोणते बदल होतात आणि जिल्हा बँकेच्या निवडणुकीवर त्याचे काय पडसाद उमटतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलंय.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत आत्मचिंतनाचा सल्ला…
गोकुळमधील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सतेज पाटील यांनी हसन मुश्रीफ यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीबाबतही विचारपूर्वक निर्णय घेण्याचा सल्ला दिलाय. गोकुळमधील आरोप-प्रत्यारोपांचे पडसाद आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उमटणार का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
आता मुश्रीफ काय प्रत्युत्तर देणार?
नावीद मुश्रीफ यांच्या पराभवामागे षड्यंत्र असल्याचा हसन मुश्रीफ यांचा आरोप आणि त्यावर सतेज पाटील यांनी उपस्थित केलेले सवाल, यामुळे कोल्हापूरच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांना धार आली आहे. आता सतेज पाटील यांच्या टीकेला हसन मुश्रीफ काय प्रत्युत्तर देतात आणि जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.




