नवी दिल्ली – दिल्लीच्या वातानुकूलित दालनात केंद्रीय मंत्र्यांसोबत झालेली ऊस उत्पादक शेतकऱ्यांची उच्चस्तरीय बैठक पूर्णपणे निष्फळ ठरली आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या पदरात पुन्हा एकदा आश्वासनांचे गाजर टाकले आहे. सरकारच्या या उदास भूमिकेमुळे संतप्त झालेल्या शेतकरी संघटनांनी आता थेट आरपारची लढाई जाहीर केली आहे.
आजपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांमध्ये राष्ट्रीय महामार्ग रोखून ‘चक्का जाम’ आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे. नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय कृषी विज्ञान केंद्र पुसा येथे बैठक पार पडली.
यावेळी केंद्रीय कृषिमंत्री म्हणाले कि, आम्ही दरवर्षीच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी मध्ये वाढ करून दिली आहे. यावर बोलताना शेट्टी म्हणाले कि, तुमच्या विभागाने एफआरपी वाढविलेल्याचे सादरीकरण केले मात्र खते , कीटकनाशके , औषधे , मजूरी व तोडणी वाहतूक, साखर कारखान्यांचा प्रक्रिया खर्च कितीने वाढली याची पण माहिती घ्या हि माहिती व याबाबतचे वास्तव सांगण्यासाठी गेल्या दोन वर्षापासून वेळ मागत आहे पण शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी तुमच्याकडे वेळ नसल्याचे बैठकीत खडसावून सांगितले. साखरेचा हमीभाव गेल्या आठ वर्षात न वाढल्याने साखरेवर दिले जाणारे कर्ज कमी मिळत असल्याने कारखाने आर्थिकदृष्ट्या अडचणीत येत असल्याचे सांगितले. जरी केंद्र सरकारने एफआरपी मध्ये वाढ केली असली तरी एफआरपीचा बेस वाढविल्याने त्याचा शेतकऱ्यांना काहींच फायदा झालेला नाही. केंद्र सरकारने या तीन मागण्यावर तातडीने निर्णय न घेतल्यास उद्यापासून राष्ट्रीय महामार्ग बंद करून कारखान्यातून बाहेर पडणारी साखर सुध्दा अडविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याउलट तीन तास झालेल्या बैठकीनंतर केंद्रीय कृषी मंत्री यांनी समिती नेमून येत्या महिन्याभरात या विषयावर मार्ग काढू असा निर्णय दिला. यावेळी राजू शेट्टी संतप्त होवून दोन्ही मंत्र्यांसमोरच बैठकीत म्हणाले कि तुमच्याकडे कोणतेच अधिकार नव्हते तर बैठकीचे गाजर दाखविलेच का ? सरकारच्या या नकारात्मक भूमिकेनंतर शेतकरी नेते संतप्त होऊन बैठकीतून बाहेर पडले आणि त्यांनी दिल्लीच्या भूमीवरूनच आक्रमक आंदोलनाची घोषणा केली. कोल्हापूर-बेळगाव सीमेवरील कोगनोळी टोल नाका, कराड, सातारा आणि इंदापूर येथे हजारो शेतकरी रस्त्यावर उतरून पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग रोखून धरणार आहेत.पश्चिम महाराष्ट्रासोबतच मराठवाड्यातील परभणी आणि नांदेड जिल्ह्यांमध्येही राष्ट्रीय महामार्ग रोखले जातील. कर्नाटक राज्य रयत संघ आणि ग्रीन ब्रिगेडच्या वतीने हुबळी, गदग आणि हत्तरकी भागातील प्रमुख महामार्ग बेमुदत रोखले जाणार आहेत.
त्यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे आणि उत्तर कर्नाटकात प्रवास करणाऱ्या नागरिकांनी प्रवास टाळावा किंवा पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन करण्यात येत आहे. “आता चर्चा नाही, तर थेट निर्णय पाहायचा आहे. सरकारला शेतकऱ्यांची ताकद दाखवून दिल्याशिवाय मागे हटणार नाही,” असा सज्जड दम राजू शेट्टी यांनी दिला आहे.
या बैठकीस कर्नाटक राज्याचे सहकार मंत्री लक्ष्मण सवदी , कृषी मंत्री चलोराय स्वामी , साखर मंत्री रूद्राप्पा लमानी , केंद्र सरकारचे कृषी व अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव तसेच कर्नाटक व महाराष्ट्रातील शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.




