देवाळे येथील राधाने पहिल्याच वेतात दिला जुळ्या मादी वासरांना जन्म

कोल्हापूर – पन्हाळा तालुक्यातील देवाळे येथील पशुपालक विक्रांत गायकवाड यांच्या मालकीच्या ‘राधा’ या HF गायीने पहिल्याच वेतात दोन जुळ्या मादी वासरांना जन्म दिला आहे. दोन्ही वासरे सुदृढ आणि निरोगी आहेत त्यामुळे पशुपालक विक्रांत गायकवाड हे आनंद व्यक्त करत आहे.

त्यांचे जन्मावेळी वजन सुमारे 31 आणि 32 किलो होते. या गायीचे कृत्रिम रेतन Sex-Sorted सीमेनद्वारे करण्यात आले होते. विक्रांत गायकवाड हे राधाला अवघ्या दोन महिन्यांची असतानापासून सांभाळत आहेत. तेव्हापासून तिच्या वाढीपासून ते पहिल्या प्रसूतीपर्यंत आहार, आरोग्य, लसीकरण, जंतनाशक उपचार आणि प्रजनन व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष देण्यात आले.

गायीच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर तिचे आरोग्य, शरीराची वाढ व प्रजननक्षमतेकडे लक्ष देण्यात आले. योग्य वय आणि शारीरिक विकास झाल्यानंतर तिचे कृत्रिम रेतन Sex-Sorted सिमेन द्वारे करण्यात आले. गर्भधारणेच्या संपूर्ण कालावधीत गायीच्या आहार, आरोग्य व गर्भावस्थेच्या व्यवस्थापनाचे शास्त्रीय पद्धतीने नियोजन करण्यात आले. राधाच्या संपूर्ण प्रक्रियेत पशुधन विकास अधिकारी डॉ. वर्षा गावडे, यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच डॉ. प्रकाश गायकवाड, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी यांचे सहकार्य मिळाले. कृत्रिम रेतनाची प्रक्रिया डॉ. श्रेयश लोहार, कृत्रिम रेतन तंत्रज्ञ यांनी केली.
गायीच्या प्रजनन व प्रसूती व्यवस्थापनाबाबत डॉ. नितीन मार्कंडेय, सेवानिवृत्त सहयोगी अधिष्ठाता, पशू प्रजनन व प्रसूतीशास्त्र, माफसू विद्यापीठ, परभणी यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच पशुआहार व्यवस्थापनासाठी आहारतज्ज्ञ डॉ. पराग घोगळे यांचे मार्गदर्शन मिळाले. याशिवाय खाजगी पशुवैद्यकीय सेवेत कार्यरत डॉ. मानसिंग पाटील व डॉ. प्रीतम पाटील यांचेही वेळोवेळी सहकार्य लाभले.

Scroll to Top