कोल्हापूर – पन्हाळा तालुक्यातील कोपार्डे-मरळी येथील उसाच्या शेतात दुपारी १ च्या सुमाराला आगीची घटना घडली. मरळी गावात जाणाऱ्या रस्त्यावरील, खांबे यांच्या शेतात विजेच्या तारा एकमेकांवर घासल्याने ठिणग्या पडल्या. या ठिणग्यांनी सुरवातीला वाळलेला पाला पेटला. कडक ऊन आणि वाऱ्यामुळे काही क्षणांतच या आगीने रौद्ररूप धारण केले आणि बघता बघता ही आग संपूर्ण शिवारात पसरली.
आगीची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र वाऱ्याचा वेग जास्त असल्याने आग विझवण्यात अडथळे आले त्यामुळे आठ एकरांतील तोडणीला आलेला ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. ऊसाच्या मध्यभागी असलेली केळीची बागही या आगीत होरपळून निघाल्याने काढणीला आलेली केळी बाधित झाली.
या भीषण आगीत बाबूराव चौगुले, भारत खांबे, नानासो पाटील, अमर पवार, अनिल खांबे, झुंजार खांबे, सचिन पाटील, नामदेव पाटील आणि राजेश पाटील या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. ऐन तोडणीच्या काळात ऊस जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले.
महावितरणच्या निष्काळजीपणामुळेच हे नुकसान झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मंडल अधिकारी सुहास घोदे आणि तलाठी शुभांगी डोंगरे यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई दयावी, अशी मागणी होत आहे.




