कोल्हापूर – साखर उद्योगासमोर येणा-या अडी-अडचणी तसेच शेतकऱ्यांच्या चालू आणि पुढील गळीत हंगामात येणाऱ्या अडचणींबाबत राज्याचे वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्यात आज सविस्तर चर्चा झाली.
केंद्र व राज्य सरकारच्या धोरणामुळे दिवसेंदिवस आर्थिक गर्तेत अडकत चाललेल्या साखर उद्योगास स्थिर करण्यासाठी धोरणात्मक महत्वपुर्ण निर्णय घेणे गरजेचे आहे. देशातील साखर उद्योगासमोर दिवसेंदिवस आव्हाने निर्माण होत असून यामुळे शेतकरी ,साखर कारखानदारी व कामगार या प्रमुख घटकांना याचा मोठा फटका बसणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून यावर्षी उस दराचे आंदोलन करत असताना शेतकरी व साखर उद्योगाच्या हितासाठी गेल्या दोन महिन्यांपासून महत्वपुर्ण मागण्या सातत्याने करत आहोत. या मागण्याबाबत केंद्र व राज्य सरकारने सकारात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे अन्यथा पुढील हंगामापासून शेतकरी आणि साखर कारखानदार यांना फटका बसून साखर उद्योग कोलमडण्याची शक्यता आहे.
यामुळे यावर्षी ऊस दराचे आंदोलन करत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रामुख्याने काही मागण्या केलेल्या आहेत. आपण केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करावा आणि वेळप्रसंगी कारखानदारांनी एकजुटीने संघर्षाची भुमिका घ्यावी, या संघर्षात ऊस उत्पादक शेतकरी आपल्यासोबत राहतील. मात्र कारखानदार केंद्र व राज्य सरकारच्या दबावाला बळी पडून काहीही निर्णय न होताच १५ ॲाक्टोंबर पासून साखर कारखाने सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास शेतकरी व कारखानदार यांचा संघर्ष अटळ असल्याचे त्यांनी मंत्री मुश्रीफांना सांगितले.




