गोकुळसाठीच्या महायुती मधील जागावाटपातला तिढा कायम; भाजप सर्व जागांसाठी अर्ज भरणार

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या पंचवार्षिक निवडणूकीत महायुती म्हणून आम्ही एकत्र लढणार असे महायुतीतील घटक पक्षांचे नेते वारंवार सांगत आहेेत पण आतापर्यंतच्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत भाजप वगळून सगळे सुरु आहे हे स्पष्ट आहे.त्यामुळे भाजपची भूमिका काय राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूरात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक झाली. या बैठकीत सोमवारी भाजप कडून सर्व २५ जागांवर उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून गोकुळच्या निवडणूकीत कोण मोठा भाऊ यावरुन नामदार हसन मुश्रीफ आणि खासदार धनंजय महाडीक यांच्या मध्ये जो वाद सुरु आहे तो जगजाहीर आहे.पण महायुतीचे नेते मात्र सगळे आलबेल असल्याचे सांगत आहेत.आजच्या बैठकीत महायुतीतील केंद्र आणि राज्यातला मुख्य पक्ष म्हणून भाजपची गोकुळच्या निवडणूकीत काय भूमिका राहणार याबद्दल सर्वांना उत्सुकता होती. बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याबद्दल माध्यमांशी बोलायला नामदार चंद्रकांत पाटील यांनी बोलायला नकार दिला, पण भाजपने सर्व जागांसाठी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे महायुती मधील जागावाटपाचा तिढा कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.


दरम्यान, मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार विनय कोरे यांनी काल अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर आजच्या बैठकीत आमदार शिवाजीराव पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर मंत्री हसन मुश्रीफ यांच्याबाबत नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. एकीकडे भाजपकडून सर्व २५ जागांवर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी सुरू असताना, दुसरीकडे महायुती म्हणून एकत्रितपणे निवडणूक लढविण्याची भूमिका कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे अंतिम जागावाटपाचा फॉर्म्युला काय ठरतो, याकडे आता लक्ष लागले आहे.

Scroll to Top