इचलकरंजी – शहरात दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी मोठा बाजार भरतो. शिवतीर्थ ते शंभूतीर्थ, आणि गांधी पुतळा या मुख्य मार्गावर गेल्या पन्नास वर्षांपासून हा बाजार भरत असल्याचा दावा छोट्या व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे. मात्र, यंदा महापालिकेने मुख्य मार्गावर दसरा-दिवाळी बाजार भरवण्यावर निर्बंध आणले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. शहरातील वाहतूक आणि अतिक्रमणाचा प्रश्न लक्षात घेऊन महापालिकेने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
या निर्णयाच्या निषेधार्थ युवा महाराष्ट्र सेना आणि छोट्या व्यापाऱ्यांच्यावतीने महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये सहभागी व्यापाऱ्यांनी ‘आम्ही तुम्हाला पाच वर्षे दिली, तुम्ही आम्हाला पाच दिवस द्या’, अशा घोषणा देत प्रशासनाचे लक्ष वेधले. मोर्चेकऱ्यांनीमहापालिकेच्या प्रांगणातही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
दरम्यान, मोर्चाचे नेतृत्व करणारे युवा महाराष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष सॅम आठवले यांनी, महापालिका प्रशासनाने छोट्या व्यापाऱ्यांचा विचार करून लवकरात लवकर तोडगा काढावा, अन्यथा महापालिकेविरोधात तीव्र आंदोलन करु तसेच गरज पडल्यास न्यायालयात दाद मागू, असा इशारा दिला आहे.
या मोर्चात सचिन बेलेकर, सतीश कवडे यांच्यासह युवा महाराष्ट्र सेनेचे पदाधिकारी, छोटे व्यापारी आणि फेरीवाले सहभागी झाले होते.




