पुणे – एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाविरोधात आज हायकोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घ्यावे आणि घरी जाऊन अभ्यासाला लागावे, असा सल्ला दिलाय. मात्र, या आंदोलनाचे नेतृत्त्व करणारे आमदार रोहित पवार यांनी आंदोलन मागे घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
कोर्ट विद्यार्थ्यांना माघार घेण्याची विनंती करत असेल तर विद्यार्थी ऐकतील, असे वाटत नाही. कारण हे विद्यार्थी अभ्यास करतात, पण सिस्टीममध्ये घोटाळे होतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागत नाही, असे आ. रोहित पवार यांनी म्हटले आहे.
आमचे आंदोलन सुरु होऊन सात दिवस झाले. आता महाज्योतीतही घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. आंदोलन करणारे एमपीएससी विद्यार्थी गरीब आहेत म्हणून त्यांची चेष्टामस्करी करणार का? जोपर्यंत राज्य सरकार भीमनवारांना घरी पाठवत नाही, तोपर्यंत विद्यार्थी ऐकणार नाहीत, असा इशारा आ. रोहित पवार यांनी दिला आहे.




