मुख्यमंत्री साहेब पूर्णतः खोटे बोलत आहेत…: आ. रोहित पवारांची फेसबुक पोस्ट

पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांचा राजीनामा घ्या, या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून पुण्यात आ. रोहित पवार आंदोलन करत आहेत. आज मंत्रिमंडळाची बैठक होत आहे यावर आ. रोहित पवार यांनी, आयोगाच्या अध्यक्षांना हटवण्यासाठी मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत ठराव करा, अशी मागणी फेसबुक पोस्ट करून केली आहे.

आ. रोहित पवार यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे कि, मुख्यमंत्री साहेब पूर्णतः खोटे बोलत आहेत. पेपर जानेवारीमध्ये फुटला किंवा पेपर त्यांच्या काळात फुटला नाही, हे कोणी सांगितले?
पार्किंगमध्ये पेपर कधी दिला? १९ मार्च, २० मार्चला दिला गेला. शिवाय, परीक्षेपूर्वी पेपर फुटला, असे FIR मध्ये स्पष्टपणे नमूद आहे. तेव्हा आयोगाचे अध्यक्ष कोण होते?
आयोगाचे अध्यक्ष हटवण्यासाठी राज्य सरकारने केवळ राज्यपालांना कलम ३१७ अंतर्गत पुढील कारवाईसाठी महामहिम राष्ट्रपतींकडे विनंती करण्याचा सल्ला द्यावा. राज्यपाल अथवा राज्य सरकारला कलम ३१७ नुसार चौकशी करण्याचा अधिकारही नाही आणि तसे बंधनही नाही. चौकशीचा अधिकार केवळ सर्वोच्च न्यायालयाला आहे, तेही महामहिम राष्ट्रपतींच्या आदेशानंतर आहे.
त्यामुळे मुख्यमंत्री साहेब, भ्रष्ट भीमनवरांसाठी कर्णाची मैत्री निभावू नका. राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या भावना समजून घ्या आणि आयोगाच्या अध्यक्षांना हटवण्यासाठी मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत ठराव करा, ही विनंती!

Scroll to Top