मुख्यमंत्र्यांनी स्वतः क्रेडिट घेऊन अध्यक्षांना तात्काळ पदावरून दूर करावे : आ. सतेज पाटील यांची मागणी

पुणे – मुख्यमंत्र्यांनी एका अधिकाऱ्यासाठी नव्हे, तर 13 कोटी जनतेसाठी शपथ घेतली आहे त्यामुळे एका अधिकाऱ्याला वाचवण्याऐवजी 25 लाख विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे राहावे. तसेच मुख्यमंत्र्यांनी स्वतः क्रेडिट घेऊन अध्यक्षांना तात्काळ पदावरून दूर करावे, अशी मागणी आ. सतेज पाटील यांनी केली आहे. ते पुण्यात एमपीएससी विद्यार्थांच्या आंदोलन स्थळावरून बोलत होते.

आ. सतेज पाटील म्हणाले कि, मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना निष्पक्ष व शुद्धपणाने काम करण्याचे वचन दिलेले असते मग सरकार राज्यातील 25 लाख तरुणांशी सूडबुद्धीने का वागत आहे? एका बाजूला 13 कोटी जनतेचे प्रतिनिधित्व करणारे आणि अधिकारी बनू इच्छिणारे 25 लाख विद्यार्थी आहेत आणि दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्र्यांचा लाडका अधिकारी आहे. मुख्यमंत्र्यांनी एका अधिकाऱ्याला वाचवण्याऐवजी विद्यार्थ्यांची बाजू घ्यावी.

एमपीएससी सचिव हरपाळकर यांची बदली जर करण्यात आली, तर ती विद्यार्थ्यांच्या दबावामुळे केली की तथ्यांच्या आधारे केली, हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे. जर सचिवाची चुक आढळली असेल, तर त्यांचे प्रमुख असलेले एमपीएससी अध्यक्ष (भीमनवार) निर्दोष कसे असू शकतात? अध्यक्ष पदावर कायम असताना केलेली न्यायालयीन चौकशी ही केवळ एक ‘फार्स’ ठरेल, कारण चौकशी समितीला माहिती देणारा स्वतः आरोपीच्या पदावरच बसलेला आहे. आयएएस असोसिएशनचा सरकारवर दबाव आहे का, ज्यामुळे अध्यक्षांना दूर केले जात नाही? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Scroll to Top